पुण्यातील प्रसिद्ध डायनिंग हॉलची ऑनलाईन थाळी मागविणे पडले दीड लाखांना
By विवेक भुसे | Published: September 27, 2022 03:16 PM2022-09-27T15:16:51+5:302022-09-27T15:18:20+5:30
जाहिरात पाहून ऑनलाईन मागविण्याचा प्रयत्नात झाली फसवणूक
पुणे : फेसबुकवर अनेकदा आकर्षक जाहिराती सायबर चोरट्यांकडून केल्या जात असतात. त्याला आजवर अनेक जण भुलले असून त्यातून त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडला आहे. शहरातील अनेक लोकप्रिय डायनिंग हॉलच्या बाबत फेसबुकवर एकावर एक फ्री अशा जाहिराती सायबर चोरट्यांनी टाकलेल्या आहेत. त्यातून आजवर अनेकांची फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे.
फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात पाहून ऑनलाईन ऑर्डर करण्याचा प्रयत्न एका महिलेच्या चांगल्याचा अंगलट आला. सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून १ लाख ५२ हजार ३२१ रुपये काढून घेऊन फसवणूक केली.
याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील ३९ वर्षाच्या नागरिकाने कोरेगाव पार्क दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट रोजी घडला होता. फिर्यादी यांच्या पत्नीने फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात पाहून त्यावरील मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना एक अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये त्याने क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी कार्डची माहिती भरल्यावर त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस सायबर चोरट्याने घेऊन त्यांच्या खात्यातून १ लाख ५२ हजार ३२१ रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भुजबळ तपास करीत आहेत.
जाहिरातींना भुलून न जाता त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा
शहरात यापूर्वी अनेक डायनिंग हॉलच्या बाबतीत फेसबुक व इतर सोशल मीडियावर बनावट जाहिराती सायबर चोरट्यांनी टाकल्या होत्या. त्यातून अनेकांची फसवणूक झाली. सायबर पोलीस ठाण्यात अशा अनेक तक्रारी दाखल आहेत. त्यानंतर पोलिसांनी संबधित डायनिंग हॉलला सूचना देऊन तशा आवाहन सोशल मीडियावर करण्यास सांगितले होते. त्यानंतरही अशा बनावट जाहिराती अजूनही दिसून येत आहे. नागरिकांनी अशा जाहिरातींना भुलून न जाता त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी असे आवाहन करण्यात येत आहे.