Har Ghar Tiranga: पुण्यातील दीड लाख विद्यार्थी होणार तिरंगा अभियानात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:52 PM2022-08-08T20:52:55+5:302022-08-08T20:53:05+5:30
विद्यापीठात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारपासून सुरुवात
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही युवा संकल्प अभियानाचा आरंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ९) दुपारी ३ वाजता होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार, आयाेजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित हाेते.
हर घर तिरंगा अभियानानिमित्त तिरंगा आपल्या घरावर फडकवण्याची मोहीम केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केली आहे. यानिमित्त युवा संकल्प अभियानात विद्यापीठाचे ६ लाखांहून अधिक आजी-माजी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने सहभागी होतील. तसेच विद्यापीठाच्या सर्व घटकसंस्था, महाविद्यालये, परिसंस्था, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. विद्यापीठाची ७५० हून अधिक महाविद्यालये, ६५ हजार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ३ हजारांहून अधिक प्राध्यापक सहभागी हाेतील.
राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि इतर सर्व घटक संस्था महाविद्यालये व परिसंस्था आणि नागरिकांच्या सहभागातून दीड ते ५ लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या फोटोचा गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धारही विद्यापीठाने केला आहे. तसेच विद्यापीठाला महापालिकेकडून ५५ हजार तिरंगा ध्वज मिळाले असून, ते सर्व संलग्न महाविद्यालयांना प्रत्येकी १०० देण्यात येणार आहेत.
येथे करा चित्र अपलाेड
या युवा संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी तिरंगा ध्वज हातात धरून काढलेले स्वतःचे व इतरांचे फाेटाे https://spputiranga.in/photoupload/ लिंकवर टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
फोटो अपलोड करताना घ्यावयाची काळजी
- एका फोटोत एकच व्यक्ती असावी. शक्यतो झेंडा दोन्ही हातांनी छातीसमोर पकडून फोटो काढावा.
- सेल्फी स्वरूपातील फोटो चालेल.
- चेहऱ्यावर स्वच्छ प्रकाशझोत असावा. फोटो काढताना मागे स्वच्छ भिंत अथवा पडदा असावा.
- एका व्यक्तीने वरील लिंकवर स्वतःचा फक्त एकदाच फोटो अपलोड करावा.
- फोटोचे आकारमान ६ ते ७ एमबी इतकेच असावे.