शालेय पोषण आहाराचे दीडशे रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:02+5:302021-07-05T04:09:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार वाटप प्रत्यक्ष वितरीत न करता पोषण आहाराचे अनुदान लाभार्थ्यांच्या ...

One and a half hundred rupees grant of school nutrition to the beneficiary's account | शालेय पोषण आहाराचे दीडशे रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर

शालेय पोषण आहाराचे दीडशे रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार वाटप प्रत्यक्ष वितरीत न करता पोषण आहाराचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दीडशे रुपयांच्या पोषण आहाराच्या रकमेसाठी एक हजार रुपयांचे खाते उघडावे लागणार आहे. सरकारच्या या अजब निर्णयामुळे विद्यार्थ्यांची मोठी गोची झाली असून, बँकेत खाते उघडण्यासाठी पालकांची चाकण शहरातील बँकांमध्ये अक्षरशः झुंबड उडाली आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे गत वर्षांपासून शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आहे. परीक्षा न देताही सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश दिला आहे. कोरोनाचा बिकट काळ असल्याने शासनाने उन्हाळी सुट्टीतही पोषण आहार देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हा आहार शिधा स्वरूपात न देता त्याचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यास सांगितले आहे.

उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराचे अनुदान पहिली ते पाचवी १५६ रुपये तर सहावी ते आठवी २३४ रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहेत. एवढ्या तुटपुंज्या रकमेसाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत एक ते दीड हजार रुपये रोख रक्कम जमा करून खाते उघडावे लागत आहे. यामुळे पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. खाते उघडणाऱ्या किती लाभार्थ्यांना लाभ मिळेल हे आता तरी सांगता येणार नाही. परंतु चाकण शहरातील बँकांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

चौकट

चाकणमधील बँकांमध्ये बचत खाते उघडण्यासाठी चाकण परिसरातील शाळकरी मुलांसह यांच्या पालकांनी गर्दी होत आहे. बँकांसमोर मोठमोठ्या रांगा लागल्याने मुलांची बँक खाती उघडताना आणि गर्दी रोखताना बँकांची अक्षरशः भंबेरी उडाल्याचे पाहावयास मिळाले. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी किमान एक हजार रुपये लागतात. विद्यार्थ्यांना अनुदान मिळणार १५६ रुपये आणि जाणार ८४४ रुपये पदरात काहीच पडणार नाही. यामुळे आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया अशी स्थिती पालकांची झाली आहे.

चौकट

कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय बुडाले. अशा परिस्थितीत १५६ रुपयांच्या अनुदानासाठी एक हजार रुपये कुठून आणायचे या विवंचनेत पालक आहेत. शासनाने आपला निर्णय बदलण्याची मागणी केली जात आहे. पाल्य अज्ञान असल्याने संयुक्त खाते खोलावे लागत असल्याने पालकांसह मुलांनाही बँकेत घेऊन जावे लागत आहे. एकच गर्दी बँकेत होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: One and a half hundred rupees grant of school nutrition to the beneficiary's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.