दीड लाख लोकांना पाणी मिळाले नसते
By admin | Published: December 10, 2015 01:32 AM2015-12-10T01:32:30+5:302015-12-10T01:32:30+5:30
आंदोलन म्हटले, की लोकांना वेठीस धरून मागण्या मान्य करून घेणे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागाने एक वेगळा आदर्श घालून दिला
पुणे : आंदोलन म्हटले, की लोकांना वेठीस धरून मागण्या मान्य करून घेणे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागाने एक वेगळा आदर्श घालून दिला. आंदोलनात सहभाग घेतला; मात्र टंचाईचे भान ठेवून पाणी योजना बंद ठेवल्या नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे दिड लाख लोकसंख्या व चाकणमधील २५0 कंपन्यांना त्या दिवशी पाणी मिळाले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत जवळपास २५ नळ योजना चालविल्या जातात. शिवाय, ५७ प्रादेशिक योजनांच्या देखभाल-दुरुस्तीचीही जबाबदारी या विभागाकडे आहे. अभियंत्यांपासून शिपाई ते कामगार असे जवळपास ६ हजार ५०० अधिकारी- कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सोमवारपासूनच त्यांनी पंपिंग बंद केले होते; मात्र पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलनात सहभाग घेतला. त्याअगोदर काळ्या फिती लावून निषेध केला. मात्र, पाणीपुरवठा केंद्र चालू ठेवले. त्यामुळे या विभागातील गावांवर या कालावधीत पाणी-पाणी करण्याची वेळ आली नाही. जीवन प्राधिकरणातर्फे बारामतीतील, जळोची, देहू, औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेले चाकण, डोंगरगाव तसेच पुणे शहरालगतचे वेगाने शहरीकरण वाढत असलेल कोंडवे-धावडे येथील पाणी योजना चालविल्या जातात. या योजनांवर येथील सुमारे दिड लाख लोकसंख्या व चाकणमधील २५0 कंपन्या अवलंबून आहेत. पाणी बुद केले असते तर एवढी मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळाले नसते. (प्रतिनिधी)