गुजरातहून विक्रीसाठी आलेला दीड कोटी रुपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 04:51 PM2018-03-16T16:51:00+5:302018-03-16T21:15:26+5:30
चाकणजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून हा माल आला आहे.
पुणे: शहर व ग्रामीण पोलीस, अन्न आणि प्रशासन प्रशासनाने (एफडीए) केलेल्या संयुक्त कारवाईत पावणेदोन कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतुक करणारे ट्रक ताब्यात घेतले. चाकणजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून हा माल आला आहे.
पंकज बलदोटा (रा.आळंदी) व गणेश बोराटे (रा.देहु रस्ता), दिपक मोर्या (वय २४, उत्तरप्रदेश), रेशनु सरोज (वय २५, रा.उत्तरप्रदेश), मनोज यादव (वय ३० ,रा.उत्तरप्रदेश), संतोष चौरासिया( रा. उत्तरप्रदेश) व निलेश बोराटे(वय ३२,रा.मॉर्डन महाविद्यालयाशेजारी) अशी आरोपींची नावे आहेत. राज्यात बंदी असलेल्या गुटखा व पानमसाल्याची बेकायदा वाहतुक होत असल्याची माहिती पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. आळंदीतील पंकज बलदोटा व त्याचे साथीदार हे संघटीतपणे बेकायदा गुटखा विक्री करत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याच्यावर मागील दोन महिन्यांपासून अंमली पदार्थ विरोधी पथकाची पाळत होती. बलदोटा हा गुजरात व कर्नाटक राज्यातून गुटखा विक्रीसाठी आणत होता. पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे व त्यांच्या पथकाने बलदोटाची गुटखा विक्रीच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली होती. गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दोरगे, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक एस.बी.पाटील, पोलीस उपनिरीक्षक औटे यांनी सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.
शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास चाकण कुरळी फाटा येथील हिंदुस्तान पेट्रोल पंपावर आरोपी संशयीतरित्या उभे होते. त्यांच्या चार ट्रकची तपासणी केली. असता त्यात गुटखा व सुगंधीत तंबाखूचा साठा आढळला. दरम्यान हे ट्रक ताब्यात घेतल्यावर ते सोडवण्यासाठी निलेश बोराटे हा आला होता. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने पंकज बलदोटा व गणेश बोराटे यांनी हा गुटखा मागवला असल्याचे सांगितले. याची विक्री पंकज बलदोटा जिल्ह्यातील विविध दुकानदारांना करीत असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून गुटखा पानमसाल्याचा १ कोटी ४७ लाख ४२ हजार रुपयांचा आणि सुगंधित तंबाखूचा २३ लाख ३८ हजार रुपयांचा साठा आणि ६० लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीएचे पुणेचे सहायक आयुक्त ए. जी. भुजबळ यांनी दिली.