शिकाऊ तसेच पक्क्या वाहन परवान्यासाठी दीड महिन्यांचे ‘वेटिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 07:00 AM2019-10-08T07:00:00+5:302019-10-08T07:00:02+5:30
शिकाऊ तसेच पक्क्या परवान्यासाठीचा दैनंदिन कोटा सातत्याने वाढविला जात आहे...
पुणे : शिकाऊ तसेच पक्क्या वाहन परवान्यासाठी वाहन चालकांना दीड महिन्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे. ऑनलाईन पध्दतीने पूर्वनियोजित दिवस व वेळ मिळाल्यानंतरच परवान्यासाठी चाचणी घेतली जाते. पण सध्या दुचाकीसह सर्वप्रकारच्या वाहनांचा परवाना मिळविण्यासाठी जवळपास दीड महिने वाट पाहावी लागत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ)कडून पूर्वनियोजित वेळेचा कोटा सातत्याने वाढविला जात असला तरी प्रतिक्षा यादी आटोक्यात येताना दिसत नाही.
वाहनाचालकांना शिकाऊ किंवा पर्मनंट वाहन चालन परवान्यासाठी वाहन प्रणालीवरून ऑनलाईन पुर्वनियोजित वेळ घ्यावी लागते. त्यानंतरच संबंधित दिवशी चाचणी घेतली जाते. मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू असल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी वाहनचालकांना थेट कार्यालयात येऊन चाचणी द्यावी लागत होते. पण त्यामुळे वाहनचालकांची मोठी गर्दी होऊन यंत्रणेवर ताण येत होता. आॅनलाईन प्रक्रियेमुळे त्यामध्ये सुटसुटीतपणा आला आहे. मात्र, दर दिवशीचा चाचणीचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर पूर्वनियोजित वेळ मिळत नाही. संबंधित चालकांना पुढील दिवसाची वेळ घ्यावी लागते. सुरूवातीला कोटा खूपच कमी असल्याने वेळ मिळविण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत होता. त्यामुळे वाहनचालक हैराण होत होते.
यापार्श्वभूमीवर ‘आरटीओ’कडून टप्याटप्याने कोटा वाढविण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिक्षा कमी झाली असली तरी आणखी दीड महिन्यांचे ‘वेटिंग’ आहे. वाहनचालकांना दीड महिन्यानंतरची वेळ मिळत आहे. शिकाऊ परवान्यासाठी संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालयामध्ये चाचणी होते. तेथील दैनंदिन कोटा ५५० एवढा आहे. तर दुचाकी व रिक्षा साठीचा दैनंदिन कोटा अनुक्रमे ३६० व ३० एवढा करण्यात आला आहे. ही चाचणी फुलेनगर येथे घेतली जाते. भोसरी येथील ‘आयडीटीआर’च्या ट्रॅकवर हलके मोटार वाहनांची चाचणी घेतली जाते. येथील दैनंदिन कोटा ४०० पर्यंत वाढविला आहे. त्यानंतरही वाहनचालकांना दीड महिन्यांची प्रतिक्षा करावी लागत असल्याची स्थिती आहे.
---
शिकाऊ तसेच पक्क्या परवान्यासाठीचा दैनंदिन कोटा सातत्याने वाढविला जात आहे. पुर्वनियोजित वेळेचा कालावधी खुप कमी झाला आहे. पक्क्या परवान्यासाठी दुचाकीला ४० दिवस तर चारचाकी सुमारे ४५ दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे. पुर्वी हा कालावधी खुप जास्त होता.
- विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
...........
नवीन वाहन नोंदणी आज सुरू राहणार
पुणे : दसरा सणाच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून ताबा मिळावा, यासाठी मंगळवारी (दि. ७) प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवले जाणार आहे, अशी माहिती आरटीओ अजित शिंदे यांनी दिली.
दरवर्षी दसºयाच्या दिवश्ी मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी केली जाते. नोंदणी क्रमांक मिळाल्याशिवाय या वाहनांचा ताबा वाहनमालकाला मिळत नाही. यादिवशी ‘आरटीओ’ला शासकीय सुट्टी असते. पण नागरिकांच्या सुविधेसाठी हे कार्यालय मंगळवारी सुरू ठेवले जाणार आहे. संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालय, आळंदी रस्ता चाचणी मैदान येथील नवीन वाहन नोंदणीविषयक कामकाज सुरू ठेवणार आहे. तात्पुरती वाहन नोंदणी, नवीन वाहन नोंदणी तसेच कर वसुलीचे काम करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.