१९०० किमी अंतरात दीड हजार पीएमपी बसची कुरियर सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:18+5:302021-05-27T04:11:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रोज अकरा लाख पुणेकरांचा प्रवास घडविणारी पीएमपी आता स्वतः नव्या प्रवासाची तयारी करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रोज अकरा लाख पुणेकरांचा प्रवास घडविणारी पीएमपी आता स्वतः नव्या प्रवासाची तयारी करीत आहे. पीएमपी आता कार्गो आणि कुरियर सेवा देणार आहे. काही खासगी कुरियर कंपन्यांसोबत मिळून ही सेवा सुरू होणार आहे. या संदर्भात गुरुवारी (दि. २७) कुरियर कंपन्यांसोबत बैठक आयोजित केली आहे.
रोज दीड हजारांपेक्षा जास्त पीएमपी बस जवळपास १९०० किलोमीटर अंतर कापतात. तीनशे वेगवेगळ्या मार्गांवर त्या धावतात. त्यामुळे पीएमपी कुरियर सेवा ही गतिमान असणार आहे, असे पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लॉकडाऊनमुळे पीएमपीला आर्थिक फटका बसला. लॉकडाऊनपूर्वी पीएमपीतून रोज सुमारे अकरा लाख प्रवासी प्रवास करीत. त्यातून दैनंदिन सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळत असे. सध्या सार्वजनिक सेवा बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पीएमपीने आता ‘नॉन टिकेटिंग रेव्हेन्यू’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
यात ते कार्गो आणि कुरियरची सेवा देणार आहे. त्याचे दर किती असणार, मिळणारा संभाव्य नफा किती असू शकेल याबाबतचे निर्णय लवकरच घेतले जाणार आहेत. आणखी काही निर्णय झाला नाही. मात्र याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. आयुर्मान संपलेल्या गाड्या भंगारात न घालता त्या कार्गो (माल) वाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. जवळपास ३० गाड्यांचा यासाठी वापर होईल. पीएमपीचे शहरात १३ डेपो आहेत. आणखी पाच नवीन डेपो तयार होणार आहे. कार्गोच्या बसमधून एका डेपोतून दुसऱ्या डेपोत मालाची वाहतूक करता येणार आहे.
चौकट
दारोदार कुरियर सेवा
कुरियर वाहतूक प्रवासी बसमधूनच केली जाईल. त्यासाठी वाहकांच्या सीटखालची अथवा चालकाजवळची जागा निश्चित करून त्या ठिकाणी छोटा लाकडी बॉक्स ठेवला जाईल. त्याला ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ असेल. ज्या भागातील ते पार्सल अथवा कुरियर असेल तिथे बस येण्यापूर्वी संबंधित कुरियर कर्मचाऱ्यास त्याची माहिती मिळेल. बसमधून ते पार्सल घेऊन तो संबंधित व्यक्तीकडे पोहोचवेल.
चौकट
कंपन्यांचा पुढाकार
“पीएमपी सोबत काम करण्यासाठी चार कंपन्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. बैठकीनंतर अधिक तपशील स्पष्ट होईल. ही सेवा सुरू करण्यापूर्वी आम्ही अनेक बाबींचा अभ्यास केला आहे. त्यामुळे निश्चितच यात यशस्वी होऊ. निविदा प्रक्रिया पूर्ण करुन १५ ऑगस्टपासून सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.” -
डॉ राजेंद्र जगताप, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.