बँक डेटा चोरी प्रकरणात बँकेच्या कर्मचाऱ्यासह एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:48+5:302021-04-08T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विविध बँकेतील खातेदारांच्या बँक खात्यातील गोपनीय माहिती चोरी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विविध बँकेतील खातेदारांच्या बँक खात्यातील गोपनीय माहिती चोरी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. त्यातील एक बँकेचा कर्मचारी असून त्याने बँक खातेधारकांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती पुरविल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भीमसेन राजेंद्र सिंग (वय ३६ रा. विश्वकर्मा संकुल, ठाणे) आणि शैलेंद्र अशोक सिंग (वय ३८, रा. सर्वोदयनगर प्रयागराज (इलाहाबाद) उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. यामधील शैलेंद्र सिंग हा एचडीएफसी बँकेतील कर्मचारी आहे. यापूर्वी पोलिसांनी रवींद्र महादेव माशाळकर (वय ३४), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय ३४) मुकेश हरिश्चंद्र मोरे (वय ३७), राजशेखर यदैहा ममीडा (वय ३४), रोहन रवींद्र मंकणी (३७), विशाल धनंजय बेंद्रे (वय ४५), सुधीर शांतीलाल भटेवरा उर्फ जैन (वय ५४), राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२), परमजित सिंग संधू (वय ४२), अनघा अनिल मोडक (वय ४०), दिलीप लालजी सिंग (वय ३०) यांना अ़टक केली होती.
आयसीआयसीय, एचडीएफसी व अन्य बँकांमधील नागरिकांच्या सक्रिय व निष्क्रिय बँक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती आरोपींनी काही व्यक्तींच्या मदतीने बेकायदेशीर व अनधिकृतपणे चोरली होती. हीच गोपनीय माहिती पुण्यातीलच काही व्यक्तींना विक्री करण्यासाठी आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १६ मार्च रोजी अटक केली होती. आरोपींकडे असलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये होते. हीच रक्कम आरोपी चोरी करणार होते, त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
दरम्यान, या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन काही जणांना अटक केली होती. त्यामध्ये मोबाईल डेटा पुरविण्याचे काम करणाऱ्या एकाला गुजरातमधील वापी येथे जाऊन पोलिसांनी अटक केली होती. तसेच आणखीही तपास पोलिसांकडून सुरू होता. आता या प्रकरणात आणखी दोन जण पोलिसांच्या हाती लागले आहेत. दोघांना बुधवारी (दि.७) न्यायालयात हजर करण्यात आले.
गोपनीय माहिती आणखी कुणाला दिली का?
आरोपी भीमसेन सिंग याने व त्याचा मित्र लवकुश या दोघांनी मिळून बँकेचा कर्मचारी असलेल्या शैलेंद्र सिंग याच्याकडून बँकेतील खातेधारकांच्या बँक खात्यांची सविस्तर माहिती मोबाइल व्हॉटसअपद्वारे दिली. त्याचा तपास करायचा आहे. शिवाय भीमसेन सिंग याने त्याच्याकडील मोबाइल फोनमधील बँकाच्या डॉरमट खात्याची व इतर बँक खातेधारकांची माहिती व्हॉटसअपद्वारे मिळविल्यानंतर नष्ट केली आहे. शैलेंद्र सिंग आणि भीमसेन सिंग यांनी बँकेच्या खातेधारकांची गोपनीय माहिती आणखी कुणाला दिली आहे का? याबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. याबाबत सखोल तपास करायचा आहे, असे वकिलांनी सांगितल्यावर न्यायालयाने दोघांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.