बेकायदा सावकारी व्यवसायातून व्याजापोटी धमक्या, चार महिलांसह एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:13+5:302021-07-22T04:09:13+5:30
पुणे : बेकायदा सावकारीतून व्याजापोटी ज्यादा रक्कम वसूल करण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन बळजबरीने १ कोटी ४३ लाख ...
पुणे : बेकायदा सावकारीतून व्याजापोटी ज्यादा रक्कम वसूल करण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन बळजबरीने १ कोटी ४३ लाख २३ हजार ६३५ रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी चार महिलांसह एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शगुफ्ता आयाज सैय्यद (वय ४० रा. साळुंखे विहार, वानवडी), फरिदा युसूफ खान ( वय ४२ रा. वानवडी), आसमा नईम सैय्यद (वय ३५ रा. भवानी पेठ) शेहनाज आसिफ शेख (वय ४९, सैय्यदनगर हडपसर) आणि आबीद शब्बीर शाह उर्फ डी.जे (वय ३४, रा. खडकी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विमाननगर येथील एका ४५ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीने वडिलांच्या उपचाराकरिता आरोपी महिलांकडून २४ लाख रुपयांची रक्कम घेतली होती. मात्र, घेतलेल्या पैशांची मुददल आणि व्याजापोटी फिर्यादी आणि तिच्या बहिणीकडून १ कोटी ४३ लाख २३ हजार ६३५ रुपयांची रक्कम फिर्यादी आणि तिच्या आईला शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देऊन वसूल करण्यात आली. फिर्यादी आणि तिच्या आईकडून बळजबरीने चेक लिहून घेत को-या स्टँम्प पेपरवर सहया घेतल्या आहेत. पोलीस खात्यात आमची ओळख असून तुम्हाला खोट्या गुन्हयात अडकवतो अशी धमकी दिल्याने फिर्यादीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली नव्हती. परंतु, सततच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. २०१४ ते २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. पाचही जणांना अटक करून बुधवारी (दि. २१) न्यायालयात हजर करण्यात आले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, फिर्यादीकडून स्ट्ँपपेरवर जबरदस्तीने लिहून घेत त्यांची सही घेऊन हा स्टँपपेपर स्वत:कडे ठेवला. हा दस्तऐवज आरोपींकडून जप्त करायचा आहे. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाकडून २०१४ ते २०२१ पर्यंत १ कोटी ४३ लाख २३ हजार ६३५ रुपयांची रक्कम घेतली आहे. याबाबत तपास करून ही रक्कम आणि पुरावे हस्तगत करायचे आहेत, त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत का? त्याचा बारकाईने तपास करायचा आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केला. तो युक्तीवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.