बनावट नोटाप्रकरणी एकास अटक
By Admin | Published: July 7, 2017 03:33 AM2017-07-07T03:33:49+5:302017-07-07T03:33:49+5:30
महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून उकळलेली दीड लाखाची रक्कम परत करण्याची वेळ आली. त्या वेळी या संकटातून बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून उकळलेली दीड लाखाची रक्कम परत करण्याची वेळ आली. त्या वेळी या संकटातून बाहेर पडण्यासाठी दोन हजारांच्या बनावट नोटा घेऊन आलेला भामटा काळेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बनावट नोटा हातावर टेकवून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. काळेवाडी पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप वसंत बिवलकर (वय ४०, रा. नारायण पेठ,पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
काळेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नामदेव कदम (वय २०, निसर्ग कॉलनी,नखातेनगर, काळेवाडी) या तरुणाने बिवलकर याच्याविराधोत काळेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी - सीताराम जाधव या रिक्षाचालकाच्या माध्यमातून राहुल कदम या फिर्यादीची आरोपी बिवलकर याच्याबरोबर ओळख झाली. पुणे महापालिकेत, तसेच शासन दरबारी आपली चांगली ओळख आहे. पुणे महापालिकेत काही जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. कोणी असेल तर सांगा, काम करून देतो, अशी बतावणी आरोपीने केली. त्यामुळे राहुल कदम यांनी त्यांच्या नातेवाइकांना नोकरीची संधी मिळत असेल, तर बघा असे सांगितले. खात्रीने काम करून देतो, असे सांगून बिवलकरने त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर मात्र पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. महापालिकेतून मुलाखतीसाठी पत्र आले नाही. बिवलकर याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो टाळू लागला. काम झाले नाही. त्यामुळे पैसे परत करा, असे वारंवार सांगूनही तो प्रतिसाद देत नव्हता. त्याचा शोध घेऊन पैसे परत द्यावेत, असा राहुल कदम यांनी आग्रह धरला. चार-पाच दिवसांपूर्वी त्याने उसने घेतलेले पैसे परत करणार असल्याचे प्रतिज्ञापत्रावर लेखी दिले. लेखी दिले असल्याने आपण अडचणीत येऊ याची भीती वाटल्याने त्याने त्यावर मार्ग काढण्याची शक्कल लढवली. कदम यांना काही रक्कम देऊन लेखी दिलेले प्रतिज्ञापत्र मागता येईल,असे ठरवून बिवलकर निसर्ग कॉलनीत आला. त्याच्याकडे देण्यास पैसे नसल्याने त्याने बनावट नोटा आणल्या. निसर्ग कॉलनीत येऊन बनावट नोटा हाती देऊन प्रतिज्ञापत्र घेऊन तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.