मध्य प्रदेशातील साडेअठरा कोटींच्या फसवणूकप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:03+5:302021-07-17T04:10:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : मध्य प्रदेशात १८ कोटी ५० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी काटेवाडी (ता. बारामती) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : मध्य प्रदेशात १८ कोटी ५० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी काटेवाडी (ता. बारामती) येथील युवकास मोरगाव येथे अटक करण्यात आली. कोट्यवधी रुपयांच्या प्रकरणाची पाळेमुळे बारामती तालुक्यापर्यंत पोहचल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीस बारामती पोलिसांच्या मदतीने गुरुवारी (दि.१५) रात्री अटक करण्यात आली.
दिलीप बिल्डकॉन लिमिटेड, भोपाळ या कंपनीचे पंजाब नॅशनल बँकेचे १८ कोटी ५० लाख रुपयांचे धनादेशाचे क्लोनिंग करण्यात आले. त्यानंतर संबंधित धनादेश आडीबीआय बँकेच्या मॅनेजरच्या मदतीने ओडीसा येथील एकाच्या खात्यावर टाकून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्य प्रदेश) येथे गुन्हा दाखल करत तपासप्रक्रिया सुरू केली होती. या गुन्ह्यातील आरोपी आडीबीआय बॅंकेचे मॅनेजर सरोज महापात्रा यास यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर आरोपी योगेश अजित काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) हा फरार होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी एसटीएफ भोपाळ येथील तपास पथकाने बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मदत मागितली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी काटे यास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे बारामती तालुका पोलीस ठाणेकडील पथकाने हायटेक तपास करीत आरोपी काटे यास मोरगाव रोड (ता. बारामती) येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी भोपाळच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फोटो ओळी : मध्य प्रदेशमधील १८ कोटी ५० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी काटेवाडी (ता. बारामती) येथील युवकास बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
१६०७२०२१-बारामती-०७