विनयभंगप्रकरणी एकाला अटक
By admin | Published: April 2, 2016 03:26 AM2016-04-02T03:26:38+5:302016-04-02T03:26:38+5:30
२१ वर्षीय महाविद्यालयीन युवतीची छेडछाड करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या एका पोलीस मित्रावर नारायणगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून
नारायणगाव : २१ वर्षीय महाविद्यालयीन युवतीची छेडछाड करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या एका पोलीस मित्रावर नारायणगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला आज अटक केली.
शाहीद अरूरमहम्मद इनामदार (रा़ नारायणगाव, मुक्ताई मंदिराशेजारी ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. हा तरुण काही महिन्यांपूर्वी नारायणगाव पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करीत होता़
२९ मार्च रोजी सकाळी ९ च्या सुमारास बसस्थानकात मैत्रिणींची वाट पाहात बसली होती़ इनामदार याने तिच्या समोर येऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले़ वेडेवाकडे हावभाव करून चहा पिण्यासाठी चल, असे म्हणून तिला प्रवृत्त करीत होता़
त्या युवतीने घाबरून मदतीसाठी आरडाओरडा केला़ नागरिकांनी शाहीद याला पकडून त्या युवतीला त्रास का देतो, असा जाब विचारला असता, शाहीद याने नागरिकांना अरेरावीची भाषा करीत पोलीस असल्याचे भासविले. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली़ त्या वेळी त्याने पोलीस माझे काहीच वाकडे करू शकत नाही, असे उत्तर दिल्याने नागरिकांनी इनामदार यास बसस्थानकात चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले़
शाहीद गेल्या काही दिवसांपासून या युवतीला एकटक बघणे, तिच्या मागे मागे जाणे, तिला इशारा करणे, हातवारे करणे असे प्रकार करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून व घाबरून तिने परीक्षा सुरू असतानाही परीक्षेला न जाता थेट पोलीस ठाण्यात जाऊन शाहीद याच्याविरुद्घ फिर्याद दिली.