...बारामतीकरांसाठी एखादे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:15+5:302021-04-20T04:10:15+5:30
...बारामतीकरांसाठी एखादे तरी कोविड सेंटर उभारा ‘राष्ट्रवादी’चा मनसे नेत्यांना टोला बारामती : कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह ...
...बारामतीकरांसाठी एखादे
तरी कोविड सेंटर उभारा
‘राष्ट्रवादी’चा मनसे नेत्यांना टोला
बारामती : कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह आम्ही सर्व रात्रीचा दिवस करीत आहे. युध्दपातळीवर उपचार सुविधा निर्माण करण्याचा अविरत प्रयत्न गेल्या वर्षभरापासून सुरुच आहे. त्यानंतर देखील बारामती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी, ढोल आंदोलन करण्याच्या परवानगीची मागणी कशासाठी करत आहात. त्याऐवजी बारामतीकरांसाठी एखादे तरी कोविड सेंटर उभारा, ते उभारण्यासाठी घरी येऊन मार्गदर्शन करण्याची तयारी आहे, असा टोला ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी मनसेसह अन्य नेत्यांना लगावला आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन, व्हेंटिलेटर, बेडच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गुजर यांनी पत्रकार परिषद घेत संबंधितांना टोला लगावला आहे. सवंग लोकप्रियतेसाठी हे प्रकार सुरु आहेत. बारामतीचे नाव खराब करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा गुजर यांनी दिला. बारामतीमध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सर्व उपाययोजना युध्दपातळीवर करण्यात येत आहेत. कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रशासनदेखील जीव ओतून काम करीत आहे, असे असताना काही जण सवंग लोकप्रियतेसाठी बारामतीचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी तो थांबवावा. यापूर्वी आपण विरोधकांवर कधीही बोललो नाही. मात्र, वर्षभर कोरोना निर्मूलनासाठी जिवाचे रान केले आहे. माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या घरी ज्येष्ठ मंडळी,लहान मुले आहेत.त्यानंतर देखील कोरोनाचा विचार न करता ‘रिस्क’ घेऊन आमचे काम सुरुच आहे. त्या अधिकाराने आज बोलत आहे. बोलण्याची वेळ काही जणांमुळे आली, समाजाचे हित न पाहता काही जण सवंग लोकप्रियतेसाठी जे बोलत आहेत, त्यांनी बारामतीकरांना बेडची गरज आहे, यामध्ये अडथळा ठराल तर देवसुध्दा माफ करणार नाही, याची जाण ठेवा, असा इशारा संबंधितांना गुजर यांनी दिला.
या वेळी गुजर पुढे म्हणाले, की खासगी रुग्णालयात एकूण ७६७ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ३७० रुग्ण आॅक्सिजनवर, ४५ जण व्हेंटीलेटरवर आहेत. एकूण रुग्णांसाठी ७५० रेमडेसिविर इंजेक्शनची रोज मागणी आहे. त्यासाठी रुग्णाचे नाव, आॅक्सिजनचे प्रमाण, आरटीपीसीआर स्कोअर आदी माहिती असलेल्या स्वरूपाचा अर्ज तयार करण्यात आला आहे. त्याची पाहणी प्रमुख वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. त्याची मंजुरी मिळाल्यानंतरच इंजेक्शन उपलब्ध होतील. या मंजुरीचे लेखापरीक्षण केले जाणार असल्याचे गुजर म्हणाले.
बारामतीतील कोविड केअर सेंटर आणि त्यामध्ये दाखल रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- २१२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह- ११०, तारांगण महिला वसतिगृह- १०७, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ- ३००,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह- ९५, अनेकान्त एज्युकेशन सोसायटी वसतिगृह- १५८
विद्या प्रतिष्ठान वसतिगृह- ४५० बेड येत्या तीन चार दिवसांत सुरु होणार होणार आहे. १५० बेड सुरु करण्यात आले आहेत. तसेच रयत भवन- १५० बेडची सोय करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात येत्या १५ ते २० दिवसांत १५० आॅक्सिजन बेड, त्यानंतर तेवढ्याच कालावधीत १५० आॅक्सिजन बेडची सोय करण्यात येत आहेत. त्यानंतरदेखील कोेरोनाकाळात काहींना राजकीय हितसंबंध जोपासायचे असल्याची शंका येते, असे गुजर म्हणाले.
...सुनेत्रा पवार बारामतीत
तळ ठोकून आहेत.
बारामती शहरातील कोरोनाच्या परीस्थितीवर पवार कुटुंबीय लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीत तळ ठोकून आहेत. कोरोनाशी लढा देताना प्रत्येक घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे. राज्यात बारामतीचे नाव विकसनशील शहरांमध्ये आवर्जून घेतले जाते. त्या बारामतीकरांच्या, बारामतीच्या नावाला गालबोट लागणार नाही. बारामती कोरोनामुक्त होईपर्यंत अविरत प्रयत्न, नियोजन सुरुच राहील, असे ज्येष्ठ नगरसेवक गुजर म्हणाले.