पब्जीसाठी मित्रावर केले काेयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 03:28 PM2019-08-20T15:28:27+5:302019-08-20T15:29:53+5:30
पब्जी खेळण्यासाठी माेबाईल न दिल्याने मित्रावर काेयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे.
पुणे : पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने त्याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हडपसर येथील लोखंडी पूलाशेजारी ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत हेमंतसिंग रजपूत (वय 24, रा.महंमदवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार सनी पांडुरंग लोंढे (वय 18) व करण वानखेडे (वय 22, दोघेही रा. डवरीनगर, लोखंडी पुलाजवळ, हड्पसर) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता हडपसर येथील लोखंडी पुलाशेजारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंतसिंग व सुनील माने (वय 19, रा.मांजरी रस्ता) हे एकमेकांचे मित्र आहेत. माने हा आपल्या मोबाईलवर पब्जी गेम खेळत असताना आरोपी लोंढे याने हेमंतसिंग यांच्याकडे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला. यावेळी सुनीलने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी व सुनील यांच्यात बाचाबाची सुरु झाली. त्यावरुन करण वानखेडे यांनी सुनील माने याला ‘आज खल्लास करु, याला जिवंत सोडायचा नाही.’ असे म्हणून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम डी पाटील हे करीत आहेत.