एका रक्तदात्यामुळे वाचतो तीन जणांचा प्राण,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:01+5:302021-07-12T04:09:01+5:30
पुणे : ‘‘कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा प्रचंड भासत होता. आताही टंचाई आहेच. पण नागरिक रक्तदानासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे रक्ताची ...
पुणे : ‘‘कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा प्रचंड भासत होता. आताही टंचाई आहेच. पण नागरिक रक्तदानासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे रक्ताची गरज कमी होताना दिसते. एकाने रक्तदान केले तर तीन जणांना जीवदान मिळते. त्यामुळे प्रत्येकाने हे कार्य करणे आवश्यक आहे,’’ अशी भावना भारती ब्लड बँक सेंटरच्या क्वालिटी मॅनेजर गौरी बागडे यांनी व्यक्त केली.
सध्या कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना रक्तदान करता येत नाही. कारण कोरोना प्रतिबंधक डोस घेतला असेल तर पंधरा दिवसांनंतरच रक्तदान करता येते. पण लोकांमध्ये अजून तेवढी जागृती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी योग्य माहिती घेतल्यानंतरच रक्तदानासाठी पुढे यावे. कारण अगोदरच या महामारीमुळे रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात या डोसमुळे अडथळा येत आहे. कात्रज परिसरात लव्ह केअर शेअर फाउंडेशन हा तरुणांचा ग्रुप आहे. या ग्रुपतर्फे नियमित रक्तदान करण्यात येते.
बागडे म्हणाल्या,‘‘रक्तदान करणे अत्यंत आवश्यक आहे. थॅलेसेमिया रुग्णांसाठी तर हे खूप गरजेचे आहे. कारण त्यांच्या शरीरात नवीन रक्त तयार होत नाही. म्हणून त्यांच्या शरीराला नवीन रक्ताची गरज भासते. ते जर मिळाले नाही तर रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे रक्तदान त्यांच्यासाठी नवसंजीवनीच असते. नवीन आयुष्य असते. हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.’’
——————————————
रक्तदान करून खूप छान वाटत आहे. पुण्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता लव केअर शेअर फाउंडेशन आणि ‘लोकमत’ वृत्तपत्राने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करायचा योग आला. भारती हॉस्पिटलचे कर्मचारी आणि लव्ह केअर शेअर फाऊंडेशनचे स्वयंसेवक यांनी रक्तदात्यांना उत्तम सहकार्य केले. रक्तदानाचा अनुभव घेऊन छान वाटले.
- अपूर्वा जोगळ, रक्तदाता तरुणी