तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल; प्रेमसंबंधातून बरेवाईट केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 09:18 PM2021-03-27T21:18:55+5:302021-03-27T21:19:26+5:30
आरोपी सापडला पण तरुणीचा संपर्क नाही...
पुणे : पूर्वीच्या प्रेमसंबंधातून गोड बोलून तिचे बरेवाईट करण्याच्या हेतूने तरुणीचे अपहरण करणार्यावर चंदननगरपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागर गुंडव (रा. चांदुरबाजार, अमरावती) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी प्रतिक बापूराव गेडाम (वय २४, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या ३० वर्षाच्या बहिणीचे १० वर्षापूर्वी आरोपीबरोबर प्रेमसंबंध होते. आरोपी वाईट चालीचा असल्याचे समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध तोडले. त्यामुळे गुंडव याने अमरावती येथील त्यांच्या घरी जाऊन तोडफोड व नासधुस केली होती. त्यानंतर फिर्यादीची बहिणी पुण्यात वडगाव शेरी येथील जय अपार्टमेंटमध्ये रहायला आली होती. सागर याने तिच्याशी गोड बोलून तिला १३ मार्च रोजी घेऊन गेला. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही. चंदननगरपोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.
अमरवती पोलिसांनी केलेल्या तपासात चांदूरबाजार येथे या तरुणीचा डबा व कपडे सापडले. मात्र, तिचा काहीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिच्या भावाच्या फिर्यादीनंतर चंदननगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़.
याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थोपटे यांनी सांगितले की, आरोपी सापडला असला तरी ही तरुणी न मिळाल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या आईवडिलांनी तक्रार दिल्याने चांदूरबाजार पोलिसांनी सागर गुंडवे याला अटक केली. त्याला येत्या २ दिवसात ताब्यात घेऊन अधिक तपास करण्यात येणार आहे.