दीड कोटींचे हिरेलुटीचा बनाव उघड : रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 03:27 PM2018-07-30T15:27:16+5:302018-07-30T15:32:04+5:30
मुंबईहून पुण्याला दागिने घेऊन आले असताना रात्री चाकूने वार करत आपल्याकडील दागिन्यांची बॅग लंपास करण्यात आल्याचा बनाव आरोपींनी केला होता
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर चाकूने वार करुन दीड कोटी रुपयांचे हिरे चोरुन नेल्याचा रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यानेच बनाव केल्याचे तपासात उघडकीस आले असून चाकू हल्ल्याच्या खुणांविषयी पोलिसांना संशय आल्याने त्यावरुन त्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला़. दरोडा प्रतिबंधक विभागाने चौघांना ताब्यात घेतले आहे़ तर कर्मचारी व त्याच्या वडिलांना अटक केली आहे़.
अजय मारुती होगाडे (वय २१, रा़ सायन, कोळीवाडा, मुंबई) आणि त्याचे वडील मारुती बाबु होगाडे (वय ५५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय होगाडे याने आपल्यावर चाकूने हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद केले होते़. पण, त्याच्या पाठीवर व पोटावर झालेल्या जखमा या चाकुने वार केल्यानंतर होणाऱ्या जखमा त्या सदृश्य नसल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता़
अजय मारुती होगाडे (वय २०, रा़ सायन, मुंबई) यांनी फिर्याद दिली होती़ होगाडे मुंबईतील रांका ज्वेलर्स यांच्या काळबा देवी येथे आॅफिस बॉय म्हणून तीन महिन्यांपासून कामाला आहेत. २६ जुलै रोजी मुंबईवरून हिऱ्याचे व सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन पुण्यात आले होते. ते पुणे रेल्वे स्थानकावर रात्री एकच्या दरम्यान फ्लॅटफॉर्म क्रमांक सहावर उतरले. यावेळी ३ ते ४ जणांनी त्यांना धक्का-बुक्की करून मारहाण केली. यानंतर चाकूने वार करून त्यांच्याकडील १ कोटी ४८ लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग हिसकावून फरार झाले, अशी हकिकत त्यांनी पोलिसांना सांगितली होती़.
पोलिसांना प्रथमपासूनच होगाडे यांच्यावर संशय होता़. त्यांनी तो व्यवसायासाठी पुण्यात किती वेळा आला. याबाबत तसेच त्याच्या घरची आर्थिक परिस्थितीबाबत त्याच्याकडे सलग तपास करता त्याने त्याच्या कुटुंबावर व्याजासहीत सुमारे १२ लाख रुपयांचे कर्ज झाले व ते फेडण्यासाठी त्याने त्याच्या अंगावर या जखमा स्वत: करुन घेतल्या असल्याचे व हे दागिने त्याचा भाऊ शरद मारुती होगाडे व त्याचा मित्र अन्नूकुमार याच्या हस्ते मुंबई येथे राहते घरी पाठवून वडील मारुती होगाडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे कबुल केले़.
यावरुन त्यांनी संगनमत करुन हा गुन्हा केल्याचे उघड झाल्याने अजय होगाडे व मारुती होगाडे यांना रविवारी रात्री अटक केली़. मारुती होगाडे यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी हे दागिने त्यांच्या मुळगाव महाड तालुक्यातील पाचाड येथील रायगडवाडी येथे डोंगर पायथ्याला खड्डा करुन त्यात दागिन्याचा डबा लपवून ठेवल्याचे सांगितले़. त्याठिकाणी जाऊन हा डबा जप्त केला असून त्यात सर्व दागिने मिळून आले़.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, कर्मचारी प्रमोद मगर, धीरज भोर, मंगेश पवार, फिरोज बागवान, अविनाश मराठे, रमेश गरुड, उदय बोले, संतोष मते, नारायण बनकर यांनी केली आहे़.