वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एक कोटीच्या गाड्या, भागधारकांना मात्र दोन वर्षांपासून लाभांश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:56 AM2018-06-22T01:56:25+5:302018-06-22T01:56:25+5:30
गेल्या दोन वर्षांत भागधारकांना लाभांश देऊ न शकलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रने वरिष्ठ अधिका-यांसाठी गेल्या वर्षात १ कोटी रुपयांची वाहने खरेदी केली आहेत.
पुणे : गेल्या दोन वर्षांत भागधारकांना लाभांश देऊ न शकलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रने वरिष्ठ अधिका-यांसाठी गेल्या वर्षात १ कोटी रुपयांची वाहने खरेदी केली आहेत. अशा प्रकारच्या अनिर्बंध खर्चामुळे बँकेत गुंतवणूक करणा-यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भीती बँकेचे भागधारक आणि सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली.
डीएसके यांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर वेलणकर म्हणाले की, केवळ बँक आॅफ महाराष्ट्रच नाही, तर सर्वच राष्ट्रीयीकृत बँका अडचणीत आहेत. बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केल्यामुळे समभागाच्या किमतीवर त्याचा विपरित परिणाम झाला. सध्या समभागाचा दर १२ रुपयांपर्यंत खाली आला असून, त्यात आणखी घटदेखील होऊ शकते. गेल्या दोन वर्षांपासून बँकेने भागधारकांना लाभांश दिलेला नाही. बचत खात्यात पैसे ठेवले, तरी वर्षाला ४ ते ५ टक्के परतावा मिळतो. लाभांश मिळणार नसेल तर भागभांडवलात गुंतवणूक केली जाईल का?
काटकसर हवी
खरेतर ही जबाबदारी बँकेतील वरिष्ठ अधिकाºयांची आहे. त्यांनी काटकसरीची भूमिका घेतली पाहिजे. मात्र, बँक आॅफ महाराष्ट्रच्या उच्चाधिकाºयांसाठी गरज नसताना १ कोटी रुपयांची वाहने खरेदी करण्यात आली. व्यवस्थापन पैशांचा योग्य विनियोग करीत असल्याचा संदेश गुंतवणुकदारांमध्ये गेला पाहिजे. बँक चांगल्या पद्धतीने चालविण्याबाबत व्यवस्थापन गंभीर असल्याचे कृतीतून दिसायला हवे, असे वेलणकर यांनी स्पष्ट केले.