सोनेखरेदीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून एक कोटीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:33+5:302021-03-13T04:20:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोनेखरेदी योजनेत गुंतवणूक सुरक्षित असून कोणतीही फसवणूक होणार नाही असे आमिष दाखवले. तसेच मुदतपूर्व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोनेखरेदी योजनेत गुंतवणूक सुरक्षित असून कोणतीही फसवणूक होणार नाही असे आमिष दाखवले. तसेच मुदतपूर्व ठेव रक्कम आणि परतावा न देता एका महिलेसह नातेवाईकांची १ कोटी ५ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी लक्ष्मी रस्त्यावरील मराठे ज्वेलर्स या सराफी पेढीच्या मालकांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलिंद मराठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शुभांगी विष्णू कुटे (रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटे यांना २०१७ मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. गुंतवणूक केलेल्या रकमेवर आकर्षक परतावा देण्यात येईल, असे त्यांना मराठे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे कुटे यांनी त्यांच्याकडे ३७ लाख ८० हजार रुपये गुंतवले. कुटे यांच्या सोलापूरमधील नातेवाईकांनी २५ लाख रुपये व ओळखीच्यांनी ४३ लाख रूपये असे १ एक कोटी ५ लाख ८० हजार रुपये गुंतवले होते. मात्र कुटे आणि नातेवाईकांनी गुंतवणूक केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध कायदा (एमपीआयडी) कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बडे तपास करत आहेत.
दरम्यान, १५ डिसेंबर २०२० रोजी मिलिंद मराठे यांनी लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीत स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मराठे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.