फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:50 PM2018-05-10T18:50:10+5:302018-05-10T18:50:10+5:30
मध्य रेल्वेच्या १५ हजार ७२७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून त्यांना १ कोटी ६ लाख १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे विविध मार्गांवर राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेमध्ये एप्रिल महिन्यात १५ हजार ७२७ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे १ कोटी सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
विभागाकडून पुणे-मुळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. एप्रिल महिन्यात एकुण ३६ हजार २६९ जणांवर कारवाई करून आली. त्यांच्याकडून एकुण २ कोटी ४ लाख ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी १५ हजार ७२७ विनातिकीट प्रवासी असून त्यांना १ कोटी ६ लाख १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. मागील वर्षी एप्रिल महिन्यात ३० हजार प्रकरणांमध्ये एकुण १ कोटी ७५ लाख ६६ हजार दंड करण्यात आला होता. तपासणी मोहीम कडक करण्यात आल्याने कारवाईत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही कारवाई रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी राबविली. रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे तिकीट तपासणी मोहिम राबविली जात असल्याने प्रवाशांना तिकीट घेऊनच यात्रा करीत कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
-------