एकाच दिवसात ‘उद्या’च्या ४०० प्रतींची झाली विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:05+5:302021-03-24T04:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रसिद्ध लेखक अनंत यशवंत उर्फ नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रसिद्ध लेखक अनंत यशवंत उर्फ नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या या कादंबरीला वाचकांकडून प्रचंड मागणी वाढली आहे. एका दिवसातच ‘उद्या’ च्या ४०० प्रतींची विक्री झाली. राज्यभरातील वाचकांसह ऑनलाइन माध्यमातून या पुस्तकाला वाढती मागणी पाहाता प्रकाशकांनी तीन दिवसांतच नवीन आवृत्ती वाचकांना उपलब्ध करून दिली. त्याच्याही ६०० प्रती विकल्या गेल्या हे त्यातील विशेष! लवकरच पुढची आवृत्ती आणली जाणार आहे.
नंदा खरे हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता. मात्र या व्यवसायाबरोबरच एक कादंबरीकार, लेखक म्हणून देखील त्यांनी मराठी साहित्य विश्वात स्वत:ची वेगळी ओळ्ख निर्माण करीत, स्वत:चा वाचक वर्ग तयार केला. कादंबरी, अनुवाद, आत्मचरित्र, विज्ञान विषयक लेखन, ललित, भाषांतर आदी विविध विषयांवरील त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकताच ‘उद्या’ या कादंबरीसाठी खरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मात्र ‘समाजाकडून भरपूर मिळाले आहे, यापुढेही स्वीकारत राहाणे मला इष्ट वाटत नाही’ असे सांगत त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वाचकांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर दुणावला आहे. आजवर त्यांच्या पुस्तकांची अनेकांनी पारायणे केली आहेत. मात्र त्यांची पुस्तके संग्रही असण्याबरोबरच पुन्हा नव्याने लेखक जाणून घेण्याच्या उद्देशाने वाचकांकडून त्यांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी वाढली आहे.
नंदा खरे यांची बहुतांश पुस्तके मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. त्यांच्या पुस्तकांविषयी सांगताना, मनोविकास प्रकाशनचे आशिष पाटकर म्हणाले, प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या पुस्तकाच्या एकाच दिवसात ४०० प्रती विकल्या गेल्या. अजूनही या पुस्तकाला खूप मागणी आहे. त्यांच्या ‘उद्या’, दगडावर दगड वीटेवर वीट’, ‘दगडधोंडे’ या पुस्तकाच्या नवीन आवृत्या आल्या आहेत. त्यांच्या ‘ऐवजी’ आणि दगडावर दगड वीटेवर वीट’ या पुस्तकांच्या प्रती संपल्यामुळे त्या पुन्हा काढाव्या लागल्या. महाराष्ट्रातील बहुतांश पुस्तक विक्रेत्यांनी त्यांच्या पुस्तकांवर ३५ ते ४० टक्के सवलत योजना जाहीर केली आहे. पुरस्कारानंतर त्यांच्या पुस्तकांना मागणी वाढली आहे हे जरी सत्य असले तरी सुरूवातीपासूनच खरे यांच्या ‘अंताजीची बखर’, ‘कहाणी मानवप्राण्याची’ यांना मागणी होती आणि आहेचं. पण आता मागणीचा वेग वाढला आहे.
------
साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नंदा खरे यांच्या सर्व पुस्तकांना मागणी वाढली आहे. आम्हाला पुस्तके सातत्याने मागवून घ्यावी लागत आहे. त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीची एकाच दिवसात ५० प्रतींची विक्री झाली. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच एखाद्या लेखकाच्या पुस्तकांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे.
- रमेश राठिवडेकर, अक्षरधारा