पुण्यात आठवडयातून एक दिवस पाणीपुरवठा बंद, १८ मे पासून अमंलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 09:20 PM2023-05-09T21:20:38+5:302023-05-09T21:21:38+5:30
पाहा कधी राहणार पाणीपुरवठा बंद.
पुणे : एल निनोच्या प्रभावामुळे जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन आठवडयातून एक दिवस म्हणजे दर गुरूवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या निर्णयाची येत्या १८ मे पासून अमंलबजावणी होणार आहे.
यंदा एल निनो मुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला असून वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. उन्हाळ्याचा अद्यापही एक महिन्यांचा कालावधी बाकी आहे. उन्हामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता पाणीकपात अटळ होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कालवा समितीच्या बैठक झाली.
या बैठकीत शहराच्या अनेक भागाला सध्या विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास त्याचा परिणाम पुढील दोन दिवस रहातो. पाणीबंद असल्यानंतर पुढील काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होता. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीबंद ठेवणे योग्य असल्याचे पालिकेने सांगितले होते. त्याचबरोबरच यापूर्वी जलसंपदा विभागाबरोबरच झालेल्या बैठकीत पाणी कपातीवर चर्चा झाली हाेती.
पुणे महापालिका खडकवासला धरणातून प्रतिदिन १ हजार ४५० एमएलडी पाणी उचलते. त्यानुसार महापालिकेने पुढील काळातील पाणी पुरवठ्याचे नियाेजन करण्यासाठी महापालिकेने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महापािलका आयुक्त विक्रम कुमार आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.