एका दिवसात बारामतीच्या शिरसाई मंदिरातील चोरीचा छडा लावला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:56 PM2022-01-10T15:56:39+5:302022-01-10T17:10:52+5:30

शिर्सुफळ येथील शिरसाई देवी मंदिरातील चोरीचा अवघ्या एका दिवसात छडा लावत बारामती तालुका पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे

In one day a burglary was reported at the Shirsai temple in Baramati | एका दिवसात बारामतीच्या शिरसाई मंदिरातील चोरीचा छडा लावला

एका दिवसात बारामतीच्या शिरसाई मंदिरातील चोरीचा छडा लावला

googlenewsNext

बारामती : शिर्सुफळ येथील शिरसाई देवी मंदिरातील चोरीचा अवघ्या एका दिवसात छडा लावत बारामती तालुका पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या प्रकरणी पती-पत्नी व मेव्हणीस अटक करत राज्यभरातील २० ते २५ मंदिरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. न्यायालयाने त्यांना शनिवारी (दि. १५) पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या प्रकरणी, आरोपीतांना ताब्यात घेतले.  शाहरूख राजु पठाण (वय २४ वर्षे रा.गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव शिव तक्रारवाडी, निरा ता. पुरंदर जि. पुण),  पुजा जयदेव मदनाळ (वय १९ वर्षे रा. रा.गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव जुनाबिडी कुंभारी सोलापुर जि. सोलापुर),  अनिता गोविंद गजाकोश (वय १९ वर्षे रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे.  आरोपी मुळ गोलघुमट शिवाजी चौक विजापुर जि. विजापुर राज्य कर्नाटक येथील रहिवाशी आहेत. आरोपी शाहरूख पठाण व पुजा मदनाळ हे पती-पत्नी आहेत. तर अनिता गजाकोश ही मेव्हणी आहे.

आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील आव्हानच होते 

शनिवारी (दि. ८) रात्री १ ते ३ च्या दरम्यान शिर्सुफळ येथील असलेल्या शिरसाई मंदिरातील देविच्या अंगावरील दागिणे व मंदिरातील इतर वस्तू चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. याबबत बारामती तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तपासाबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व पोलीस ठाण्यातील अधिकारी गुन्हे शोध पथकातील अंमलदार, पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली. वेगवेगळी पथके तयार करून शिर्सुफळ, मळद, कुरकुंभ, दौड, बारामती आसपासच्या परिसरातील जवळपास ६० ते ६५ सीसीटिव्ही कॅमे-याच्या फुटेजची पाहणी केली, परंतु रात्रीची वेळ असल्याने आरोपीत यांनी वापरलेल्या वाहनाचा नंबर समजण्यास अनेक अडचणी येत होत्या. पोलीस पथकाने वेगवेगळया प्रकारे तपास करून आरोपींनी वापरलेल्या इको वाहनाचा क्रमांक मिळाला. त्याप्रमाणे पोलीस पथक सदर वाहनाच्या मालकापर्यंत पोहचले. मात्र वाहन मालकाने त्याचे वाहन दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी पिंपरी येथून चोरीस गेले असल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. अशी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे आणखी जिकरीचे झाले, परंतू तपास पथकाला तांत्रिक बाबीवरून आरोपीत हे गोकुळ शिरगाव, ता. करविर, जि. कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने गोकुळ शिरगाव, ता. करविर, जि. कोल्हापूर येथून आरोपीत राहत असलेल्या घरातून सापळा रचून  आरोपींना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस अंमलदार नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अमोल नरूटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी केलेली आहे.

आरोपींवर राज्यभरात गुन्ह्यांची नोंद...

सदर आरोपींना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली देऊन शिरसाई माता मंदिरातील चोरीसह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील वेगवेगळया जवळपास २० ते २५ मंदिरातील दागिने व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना शनिवारी (दि. १५) पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यातील अटक आरोपी शाहरूख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी भोसरी पो. ठाणे, समर्थ पो. ठाणे फरासखाना पो. ठाणे येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून आता पर्यंत शिरसाई माता मंदिरात चोरीस सर्व दागिने व पितळी वस्तू सह महाराष्ट्रातील इतर मंदिरातून चोरी केलेले दागिने वस्तू तसेच पिंपरी येथून चोरी केलेली इकोसह जवळपास १२ लाख रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

Web Title: In one day a burglary was reported at the Shirsai temple in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.