अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीस एक दिवसाची मुदतवाढ; ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:15 PM2021-08-30T19:15:10+5:302021-08-30T19:15:29+5:30
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील जागांवर सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत २९ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
पुणे: मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी-चिंचवड , नाशिक , अमरावती, नागपूर या शहरांमधील अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रवेश फेरी राबविली जात असून पहिल्या प्रवेश फेरीस एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील जागांवर सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत २९ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून पहिल्या फेरीतून प्रवेश घेण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र, शिक्षण विभागाने येत्या ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेशाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच विद्यार्थ्यांनी अलॉटमेंटनंतर प्रोसीड फॉर अॅडमिशन केल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे गुणपत्रक तसेच आवश्यक असल्यास नॉन क्रोमिलिअर प्रमाणपत्र स्टुडेंट लॉगईनमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जातीचा दाखला काढणे शक्य झाले नाही. काही विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला काढण्यासाठी प्रसाव सादर केला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी प्रस्तावाची पोच आणि वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केले असल्यास असे विद्यार्थी संबंधित प्रवगार्तून प्रवेशास पात्र राहतील. तसेच ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी खुल्या संवगार्तून प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राबाबत कोणतीही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जातप्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना तीस दिवसात जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे,अन्यथा संबंधित विद्याथ्यार्चा प्रवेश रद्द होईल,याची नोंद घ्यावी,असे राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.