पहिल्या शेतकरी आत्महत्येला झाली ३२ वर्षे ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकदिवसीय अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:50 PM2018-03-19T15:50:28+5:302018-03-19T15:50:28+5:30
देशातील पहिल्या शेतकरी अात्महत्येला 32 वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच अात्महत्या करु नका, व्यवस्थेविरुद्ध लढा हा संदेश देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग अांदाेलन करण्यात अाले.
पुणे : यवतमाळ येथील चिलगव्हाण या गावातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह १९८६ रोजी सरकारच्या चुकीच्या धोरणांना कंटाळून आत्महत्या केली होती. ही देशातील नोंद झालेली पहिली शेतकरी आत्महत्या होती. या घटनेला ३२ वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्या कुटुंबाला अभिवादन करण्यासाठी तसेच सध्याच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, पिकाला दीडपट हमीभाव द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शहरातील झाशीची राणी चौक या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्याच्या कानाकाेपऱ्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या असंख्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना तुपकर म्हणाले, साहेबराव करपे व देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच इतर शेतकऱ्यांना हिम्मत देण्यासाठी, आत्महत्या करु नका हे सांगण्यासाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करत आहोत. सरकारने स्वामिनाथन आयोगातील दीडपट हमीभावाची शिफारस लागू करावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अशी मामची मागणी आहे.