वानवडीत इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू; चार मजूर गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:27 PM2022-05-02T23:27:55+5:302022-05-02T23:31:18+5:30
स्लॅब कोसळून दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
वानवडी : वानवडीतील विकासनगर भागात इमारतीच्या स्लँबचा भरणा सुरु असताना स्लँबचा काही भाग कोसळला. यामध्ये चार मजूर गंभीर जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राम नरेश पटेल (वय ४०, मुळगाव मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे व शत्रशिंग धूभखेती (वय ३५), बरशिंग पट्टा (वय ३७), संदिप कुमार उलके (वय १८), दिपचंद मराबी (वय २७, रा. मध्यप्रदेश) हे मजूर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, बाबजी इन्फ्रा एलएलपी या कंन्ट्रक्शन कंपनीकडून इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील स्लॅबचा भरणा सुरु होता. त्यामधील जवळपास ६०० चौ.फुट स्लॅब भरणा करत असताना कोसळला. ३० फुट उंचीवर स्लॅब भरण्याचे काम सुरु होते त्यामुळे स्लॅबचा ढाचा तयार करताना वापरण्यात आलेल्या लोखंडी पाईपच्या टेकूचा आधार निकृष्ट दर्जाचा असल्याने स्लॅब कोसळला असल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाची गाडी, देवदूत घटनास्थळी दाखल झाले यामध्ये मध्यवर्ती अग्निशमन केंद्र प्रमुख प्रकाश गोरे, देवदूत वाहन चालक मनोज गायकवाड, फायरमन सुरज तारु , हर्षद येवले, सुभाष खाडे, अनिमिष कोंडगेकर, निलेश वानखेडे व मदतनीस संतोष माने यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच वानवडीतील क्विक रिस्पॉन्स टिमने जखमी मजूरांना खाजगी रुग्णालयात नेण्यात नेले.
घटनास्थळी वानवडी रामटेकडीचे सहा. आयुक्त शाम तारु, वानवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड, गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तसेच वानवडी बाजार पोलीस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक सोनालीका साठे घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्यात आला व पुढील तपास सुरु असल्याचे वानवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.
दीड वर्षापूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून काही कारणास्तव इमारतीचे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानंतर इमारत बांधकाम करणाऱ्यांकडून या आदेशाला चँलेज देत प्रकरण न्यायालयात नेले होते. महिन्याभरापूर्वीच न्यायालयातून पालिकेने दिलेल्या आदेशावरुन स्थगिती उठवण्याबाबत निर्णय देण्यात आला होता. परंतु महानगरपालिकेला बांधकाम सुरु करण्याबाबतची कोणतीही पूर्वसूचना न देता न्यायालयाच्या निकालानुसार काम सुरु केल्याचे पालिका बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
सोईस्कर रस्ता नसताना बांधकामाला परवानगी कशी? स्थानिकांचा आक्रोश
इमारतीचे बांधकाम होत असलेल्या जागेवर जाण्यास सोयीस्कर रस्ता नसताना बांधकामाला परवानगी कशी दिली? असा आक्रोश इमारती शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी व्यक्त केला आहे. कारण राज्य राखीव पोलीस दलाकडून त्यांचा खाजगी वापराचा रस्ता असल्याचे सांगत दिड वर्षापुर्वीच विकासनगरमधील रस्ता गेट लावून बंद करण्यात आला होता आणी रहिवाशांच्या व बांधकाम होत असलेल्या इमारती कडे जणारा वहिवाटीचा रस्ता फक्त पायवाट ठेवून भिंत बांधून बंद करण्यात आला होता. त्यामुळे पायवाटीऐवढ्या जागेतून जखमींना घेऊन जाण्यास अडथळा आला व रुग्णालयात उशिरा पोचल्याने एकाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता येथील संतप्त नागरीकांनी वर्तविली.