पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:08 PM2018-08-03T14:08:18+5:302018-08-03T14:09:11+5:30
इंदापूर पोलिसांनी धडक देणाऱ्या मोटारीचा सिनेस्टाईल पाठलाग करून काळेवाडी चालकाला येथे अटक केली.
बिजवडी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी गावाच्या हद्दीत मद्यधुंद कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवित तीन दुचाकीस्वरांना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून एकजण मृत्यूमुखी पडला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २) दुपारी दीड ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात हिरालाल अर्जुन पवार (वय ३५ रा. हिरजगाव, ता. उत्तर सोलापूर) हे मृत्यूमुखी पडले आहेत. पवार यांचा सहा वर्षांचा मुलगा तुकाराम, शंकर दगडू चव्हाण (वय ३०, रा. वोळे कासेगाव, सोलापूर), विजयकुमार सोपान चव्हाण (वय ३२, रा. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर), विष्णू लक्ष्मण राऊत (वय ४५, रा. कौठळी, ता. इंदापूर), तुळशीराम विठ्ठल मस्तुद (वय ३२, रा. अकलूज, जि. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. मोटारचालक सतीश भानुदास सुर्यवंशी (वय ३२, रा. कळाशी, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, सूर्यवंशी मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवीत इंदापूरहून पुण्याकडे जात होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शहरालगत पुणे बाजूकडून येणा-या दुचाकीवरील हिरालाल, मुलगा तुकाराम, मेहुणा शंतनु दगडू चव्हाण हे सोलापूरकडे जात होते. त्यांना आरोपी चालवित असलेल्या मोटारीची आधी धडक बसली. त्याने अपघात घडल्यानंतरही मोटार तशीच पुढे दामटविली. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर साधारण २० किलोमीटरवरील पळसदेव गावच्या हद्दीत दोन दुचाकींना पाठीमागून धडक देऊन विजयकुमार सोपान चव्हाण, विष्णु लक्ष्मण राऊत व तुळशीराम विठ्ठल मास्तुद या तिघांना जखमी केले.
तिथेही मोटार न थांबवता तो पुढे पळाला. दरम्यान, इंदापूर पोलिसांनी मोटारीचा सिनेस्टाईल पाठलाग करून चालकाला काळेवाडी पुलाजवळ थांबवले. त्याला अटक करण्यात आली आहे.