सेफ्टी टँकमध्ये पडून एकाचा मृत्यू तर तिघे अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:58+5:302021-09-19T04:12:58+5:30
कोरेगाव भीमा: येथील नरेंद्र नगरमधील स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये सेफ्टी टँक साफ करत असताना टाकीमध्ये पडून एका युवकाचा मृत्यू झाला ...
कोरेगाव भीमा: येथील नरेंद्र नगरमधील स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये सेफ्टी टँक साफ करत असताना टाकीमध्ये पडून एका युवकाचा मृत्यू झाला तर तिघे अत्यवस्थ आहे. या तिघांनाही एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
शुभम ईश्वर आचार्य (वय २३) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर दशरथ देवराम गव्हाणे (वय ४०), विकी नंदू दरेकर (वय २४), धरमसिंग परदेशी (वय ३५) अशी अत्यवस्थ झालेल्यांची नावे आहेत.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र नगरमधील स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये वसंत गव्हाणे यांच्या घराच्या सेफ्टी टँकची साफसफाई करत असताना अचानक प्लंबर धरमसिंग परदेशी सेफ्टी टँकमध्ये पडला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी सेफ्टी टँक साफ करणाऱ्या वाहनाचे दशरथ गव्हाणे व विकी दरेकर टाकीत उतरले असता तेही टाकीत पडल्यावर शुभम आचार्य हा तरुण टाकीतील तिघांना वाचविताना तोही सेफ्टी टँक मध्ये पडला. यावेळी शेजारील नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरपंच अमोल गव्हाणे, शिवसेनेचे अनिल काशिद , ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, संपत गव्हाणे, सागर गव्हाणे , दीपक गव्हाणे , अविनाश गव्हाणे , शौर्य प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते , ग्रामपंचायत कर्मचारी रमेश कुमार आदींनी या चौघांना टाकीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत आपल्या परीने टाकीमध्ये पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, याचवेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अग्निशामक पथकाला घटनास्थळी बोलाविण्यात आले, यावेळी अग्निशामक दलाचे विजय महाजन, नितीन माने, महेश पाटील, ओमकार पाटील, तेजस डोंगरे, उमेश फाळके, प्रशांत अडसूळ, अक्षय बागल यांनी त्या ठिकाणी आपले मदतकार्य सुरू केले. यावेळी टाकीमध्ये पडलेल्या चौघांनाही बाहेर काढण्यात आले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये शुभम आचार्य याचा मृत्यू झाला. इतर तिघांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
१८ कोरेगाव भीमा सेफ्टी टँक
कोरेगाव भीमा येथील घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी केलेली गर्दी.