पुणे: ब्रेक निकामी झाल्याने एसटीची धडक, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:25 IST2022-04-28T15:20:42+5:302022-04-28T15:25:54+5:30
अपघातानंतर मोठी वाहतूककोंडी झाली होती...

पुणे: ब्रेक निकामी झाल्याने एसटीची धडक, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर
धनकवडी (पुणे) : धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूलवरून जाणाऱ्या एस. टी. बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने उड्डाणपूलावरुन जाणाऱ्या एका चारचाकीसह, सहा ते सात दुचाकींना धडक दिली. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजता घडली. या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
संजय माणिकराव कुर्लेकर, वय ५२ वर्षे, राहणार १२, आर.एफ. कमांड हाँस्पिटलच्या मागे, वानवडी, असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते नोकरी करतात आपल्या दुचाकी (अँक्टिव्हा नंबर सीजी ४३७२) वरुन ते चालले होते. गाडीवर जात असल्याने एसटी बसने दिलेल्या धडकेत कुर्लेकर यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सातारा - स्वारगेट बस (क्रमांक एमएच ०६ एस ८४६७) ही सातारा येथून सकाळी पुण्याकडे जाण्यास निघाली. दरम्यान गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता एसटी बस धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूलावरुन जाताना अचानक एसटी बसचे ब्रेक न लागल्याने समोरच्या वाहनांना धडक देत बाजूच्या संरक्षक भिंतीला हँन्ड लाँक होऊन थांबल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान बालाजीनगर परिसरात कायम गर्दी असते. त्यामुळे उड्डाणपूलावरून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सहकारनगर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी क्रेनच्या साह्याने बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.