नदीत बुडून एकाचा मृत्यू
By admin | Published: September 17, 2016 01:14 AM2016-09-17T01:14:42+5:302016-09-17T01:14:42+5:30
पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर घाटावर गणपती विसर्जन करणाऱ्या एकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
रहाटणी : पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर घाटावर गणपती विसर्जन करणाऱ्या एकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
ही घटना गुरुवार (दि. १५) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. शंकर हुसेन लोखंडे (वय ४८, रा. वैदूवस्ती, पिंपळे गुरव) असे मृताचे नाव आहे.
लोखंडे हे पालिकेत ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागात घंटागाडी सफाई कामगार म्हणून कंत्राटी तत्त्वावर मागील १५ वर्षांपासून कामास होते. अनंतचतुर्थीदिवशी दिवसभर याच घाटावर त्यांची गणपती विसर्जनासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या ठिकाणी तराफा तयार करण्यात आला होता. गणेशभक्तांकडील गणेश मूर्ती कृत्रिम हौदात बुडवून त्या तराफ्यावरून नदीपात्रात बुडविण्यात येत होत्या. हे काम लोखंडे व त्यांचे साथीदार करीत होते. मात्र, रात्री उशिरा त्या तराफ्यावरून तोल जाऊन पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मध्यरात्री या घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले होते. मात्र, अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. पुन्हा पालिकेच्या संत तुकारामनगर अग्निशमन केंद्रातील बारा व रहाटणीतील चार जवान सकाळी साडेसात वाजल्यापासून शोध घेत होते. (वार्ताहर)