बारामती: पोलिसांच्या भीतीने पळ काढताना नदीच्या बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 04:21 PM2021-11-26T16:21:56+5:302021-11-26T16:27:14+5:30
संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत...
बारामती: सोनगाव (ता.बारामती) येथे अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकाच्या भीतीने पळ काढताना निरा नदीवरील बंधाऱ्यात बुडुन एकाचा मृत्यु झाला. या घटनेनंतर येथील वस्तीवरील संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला चढविला. यामध्ये तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गावात या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तातडीने जादा कुमक मागवत घटनास्थळी ती पाठवल्याचे सुत्रांनी सांगितले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलेश अशोक भोसले (वय ४५, रा. सोनगाव) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गेले असताना भीतीपोटी त्याने पळ काढताना निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली. यावेळी दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. सोनगाव येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने भोसले भीतीपोटी पळाला. तसेच त्याने लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात त्याने उडी मारत पलिकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.
यावेळी येथील संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.