कुटुंबातील एक तरी सैन्यात असावाच
By admin | Published: May 7, 2017 03:26 AM2017-05-07T03:26:51+5:302017-05-07T03:26:51+5:30
देशात शिस्तप्रिय पिढी तयार करायची असेल, तर शिस्तीचे धडे हे शालेय जीवनातच द्यायला हवेत़ देशाच्या सेवेसाठी प्रत्येक कुटुंबीयांनी एक जण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशात शिस्तप्रिय पिढी तयार करायची असेल, तर शिस्तीचे धडे हे शालेय जीवनातच द्यायला हवेत़ देशाच्या सेवेसाठी प्रत्येक कुटुंबीयांनी एक जण तरी सैन्य दलात भरती करावा, अशी अपेक्षा वीरचक्रविजेते निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे यांनी व्यक्त केली़
दीवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या यशोदा पुरस्काराचे वितरण साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले़, त्या वेळी ते बोलत होते़ माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़
या वेळी माधवराव मानकर, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मंगला कांबळे, दीपक मानकर, सैनिक मित्र परिवारचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, सरिता साळुंखे, हवालदार अशोक गावडे, शहीद लेफ्टनंट जनरल मनीष कदम यांचे वडील शशिकांत कदम, दत्ता सागरे, वसुधा मानकर, दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर, साधना वर्तक आदी उपस्थित होते़ या वेळी वीरपिता शशिकांत कदम आणि अमोल चौघुले यांचा विशेष सत्कार करुन आर्थिक मदतीचा हात देण्यात आला़
साळुंखे म्हणाले, ‘‘प्रत्येक जवानाचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे़ सैनिकांच्या कुटुंबीयांना दिलेला मदतीचा हात सर्वांना प्रेरणादायी आहे़’’
वीरमाता महालक्ष्मी गावडे म्हणाल्या, ‘‘मुलगा देशासाठी शहीद झाला असल,ा तरी त्यांची दोन्ही मुलेही सैन्यातच भरती करणार आहोत़’’ हर्षवर्धन मानकर यांनी प्रास्ताविक केले. आनंद सराफ यांनी आभार मानले़
उल्हास पवार म्हणाले, ‘‘एकीकडे आपण युद्धावेळी सैनिकांचे कौतुक करतो आणि दुसरीकडे मांडवगण फराटा गावात सैनिक चौघुले यांचे घर पाडले जाते, ही भूमिका योग्य नाही़’’
दीपक मानकर म्हणाले, ‘‘सुभेदार खंडोजी मानकर यांचा वसा जपताना शहिदांना वंदन आणि मदतीचा हात देण्याची प्रेरणा मिळाली़ त्यातूनच यशोदा पुरस्कार देताना त्यासोबत सैनिकांच्या कुटुंबीयांनाही गौरवले जावे़’’