GBS disease : जीबीएस एक दाखल; ८९ रुग्णांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 18:14 IST2025-02-09T18:13:17+5:302025-02-09T18:14:08+5:30
बाधितांमध्ये ३७ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या (८९) ही समाविष्ट गावातील आहे.

GBS disease : जीबीएस एक दाखल; ८९ रुग्णांना डिस्चार्ज
- अंबादास गवंडी
पुणे : शहरासह जिल्ह्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णसंख्या घटत असून, रुग्णालयात दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २४ तासांत पुण्यात एक जीबीएसबाधित रुग्णाची नोंद झाली असून, दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मागील तीन आठवड्यांपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात दूषित पाणी आणि अन्न सेवनामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखीच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातच जीबीएस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, आता ही रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात १८४ संशयित जीबीएसबाधित रुग्णांपैकी १५५ रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. त्यामध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून, केवळ एक मृत्यू जीबीएसमुळे झाल्याचे निश्चित झाले असून, अन्य पाच मृत्यू संशयित आहेत.
बाधितांमध्ये ३७ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या (८९) ही समाविष्ट गावातील आहे. २६ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २४ रुग्ण पुणे ग्रामीण, तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यांतील आहेत. तर ४७ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
नागरिकांनी काळजी घ्यावी
शहरासह जिल्ह्यातील जीबीएसबाधित रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. दूषित पाणी पिले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पाणी उकळून गार करून प्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसह अन्य लक्षणे दिसताच तत्काळ डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे.