नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 11:56 AM2024-09-29T11:56:56+5:302024-09-29T11:57:53+5:30

खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाही, मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय

One has to beg to come and see the play Veteran dramatist Ch. pra. Deshpande Purushottam Karandak Award Ceremony | नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा

नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा

पुणे: ‘कोरोनानंतर मराठी नाटक संपलेले आहे. नवरा-बायकोचे भांडण आणि रहस्यमय नाटक असेच प्रकार उरलेत. खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाहीय. मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय. आता प्रायोगिक नाटकही खर्चिक झाले. नाटक हे आपल्या जगण्याशी संबंधित काहीतरी आहे, अशी भावना असलेले मराठी लोक खूपच कमी आहेत. आज मोठी लोकंही घरोघरी फोन करून नाटक पाहायला या, अशी भीक मागून प्रयोग करताहेत,’ अशी व्यथा ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५९व्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत म. ए. सो. गरवारे कॉलेजने सादर केलेल्या ‘बस नं. १५३२’ एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेचे पारितोषिक प्रदान सोहळा ज्येष्ठ नाटककार देशपांडे यांच्या हस्ते शनिवारी (दि. २८) भरत नाट्यमंदिरमध्ये झाला. याप्रसंगी परीक्षक गिरीश परदेशी, गोपाळ जोशी, मानसी जोशी, आदी उपस्थित होते. स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि ३००१ रुपयांचे रोख पारितोषिक विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामतीच्या ‘पाटी’ एकांकिकेने, तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि २००१ रुपयांचे पारितोषिक न्यू आर्टस् ॲन्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या ‘देखावा’ या एकांकिकेला प्रदान करण्यात आला.

देशपांडे म्हणाले, नाटकाकडे सीरिअसली पाहणारे लोक कमी होत आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल आणि दुसरीकडे भाषा खल्लास होईल; पण भाषा मरणार नाही. ती जिवंत राहील. जगात भाषेचा दहावा-बारावा नंबर राहील; परंतु, त्या भाषेतून जे सांस्कृतिक घडणं आहे ते खल्लास होत जाईल. आपण सर्व गोष्टीत ‘डल्ल’ झालो आहोत. रोज सीरिअल बघून रात्री झोपून टाकायचं, असं जर केलं तर अवघड आहे. आज नाटकाकडे करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. जगणं समजून घेण्याची प्रक्रिया आहे, ती नाटकात असते. कला ही आपल्या जगण्याचा भाग आहे. नाटकातून ते समजून घेण्याचा विचार करणारे लोक कमी झाली आहेत. भाषा मेली काय, संस्कृती मेली काय, याकडे कोणाचेच लक्ष नाही.’

आपल्याकडे बुद्धिप्रामाण्यवादाचे स्तोम खूप माजवले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बुद्धिप्रामाण्यवाद ओके आहे; पण माणसाच्या जगण्यात ती काय करते? तर माणसाच्या प्रत्येक संबंधामध्ये बुद्धीमुळे समस्या निर्माण होतात. त्या बुद्धी सोडवू शकत नाही. बुद्धी ही अपयशी चीज आहे, मानवी आयुष्यातील ! चर्चेने प्रश्न सोडवू ! पण कुठं सुटतात ! माझी नाटकं वैचारिक असतात, असं बोलतात; पण ते यासाठी असतात की, विचार हे अपयशी आहेत. - चं. प्र. देशपांडे, ज्येष्ठ नाटककार

Web Title: One has to beg to come and see the play Veteran dramatist Ch. pra. Deshpande Purushottam Karandak Award Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.