एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 03:24 PM2020-03-08T15:24:29+5:302020-03-08T15:27:48+5:30

मेगा ब्लाॅकचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुण्याहून दाैंडपर्यंत पाेहचण्यासाठी साेलापूर इंटरसिटी एक्सप्रेसला तब्बल सात तास लागले.

The one hour journey took seven hours; incident between Pune to Dand Station rsg | एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार

एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार

googlenewsNext

पुणे : पाटस ते दौंडदरम्यान सबवेच्या कामासाठी रेल्वेकडून घेण्यात आलेला ब्लॉक शनिवारी प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. या कामामुळे पुण्यातून सायंकाळी ६.१० वाजता निघालेल्या सोलापुर इंटरसिटी एक्सप्रेसला दौंडला पोहचण्यासाठी तब्बल सात तास लागले. तर पहाटे चार वाजता ही गाडी सोलापुर स्थानकात पोहचली. त्यापाठोपाठ इतर लांबपल्याच्या गाड्याही खोळंबल्याने हजारो प्रवाशांचे खुप हाल झाले. 

रेल्वे प्रशासनाने दौंड ते पाटस दरम्यान सबवे बनवण्यासाठी (कॉर्ड लाईन) दि. ७ मार्च रोजी ६ तासाचा मेगा ब्लॉक घेतला होता. त्यासाठी काही गाड्या रद्दही करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ६ पर्यंत हे काम पुर्ण होईल, अशी अपेक्षा रेल्वेला होती. पण हे काम वेळेत पुर्ण न झाल्याने पुढील गाड्यांना विलंब होत गेला. पुण्यातून पुणे - सोलापूर इंटर सिटी गाडी सायंकाळी ६.१० वाजता निघाली. या गाडीच्या पुढे झेलम एक्सप्रेस होती. इंटरसिटी एक्सप्रेसला दौंड स्थानकात पोहचण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो. पण ही गाडी कासवगतीने पुढे जात-जात रात्री ८.४० च्या सुमारास केडगाव स्थानकात पोहचली. सबवेचे काम पुर्ण होत नसल्याने ११ वाजेपर्यंत ही गाडी केडगाव स्थानकातच उभी होती. गाडीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलेही होती. त्यामुळे केडगाव स्थानकात उतरून अनेकांनी मिळेल ते खायला घेतले. पण अनेकांची मोठी गैरसोय झाली. कोणत्याही स्थानकावर प्रवाशांना गाडी कधी निघणार याची माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवासीही या प्रकाराबाबत अनभिज्ञ होते. अखेर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही गाडी दौंड स्थानकात दाखल झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.

इंटरसिटी एक्सप्रेस पाठोपाठ गरीब रथ, चेन्नई एक्सप्रेस, आझाद हिंद एकाप्रेस, पुणे दौंड शटल, कोणार्क एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेस, पनवेल-नांदेड एक्सप्रेस, पुणे-दानापुर सुपर फास्ट एक्सप्रेस या गाड्याही अडकून पडल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला, अशी माहिती दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी दिली.

प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. त्यानुसार सबवेचे काम सुरू होते. पण हे काम वेळेत पुर्ण होऊ शकले नाही. अर्धवट काम सोडून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे शनिवारीच काम पुर्ण करण्यात आले. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, याची जाणीव आहे. त्याबाबद्दल दिलगीर आहोत.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

Web Title: The one hour journey took seven hours; incident between Pune to Dand Station rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.