शंभर-दीडश फोन केले अन् अखेर पुण्याला ऑक्सिजन मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:07+5:302021-05-13T04:12:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तळोजा येथील लिंडे आणि चाकण येथील टायो निप्पॉन कंपनीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तळोजा येथील लिंडे आणि चाकण येथील टायो निप्पॉन कंपनीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पुणे जिल्ह्याच्या ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. पण, यामुळे जिल्हा प्रशासन ऑक्सिजनवर जाण्याची वेळ आली. अखेर विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तब्बल शंभर-दीडशे फोन फिरवले अन् अखेर नागपूरसाठी येत असलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अर्ध्या रेल्वे ट्रॅकवरून पुण्यासाठी फिरवली. मंगळवारी रात्री उशिरा हा ऑक्सिजन पुण्यात पोहोचला आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
पुणे जिल्ह्यासाठी दररोज ३१०-३२० मे. टन ऑक्सिजन लागतोय. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११० मे. टन लिंडे या कंपनीकडून आणि टायो निप्पॉन या कंपनीकडून ४० मे. टन ऑक्सिजन मिळतो. पण या दोन्ही कंपन्यांमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने प्रचंड टेन्स निर्माण झाला. पुण्याला नियमित ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून अधिकचा पुरवठा मिळतोय का, पुण्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची राज्याच्या कक्षाला, नोडल एजन्सीला कल्पना दिली, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून काय होतय का, अशी सतत फोना-फोनी सुरू होती. अखेर नागपूरसाठी थेट फ्रान्सवरून ऑक्सिजन येत असल्याचे कळले. नागपूरसाठी येत असलेला जास्तीचा ऑक्सिजन पुण्यासाठी मिळेल का, यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आला. अखेर पुण्याला ५८ मे.टन ऑक्सिजन मिळाला.
--
नागपूरहून आलेला ऑक्सिजनचे असे झाले वाटप
ससून रुग्णालय : १५ मे.टन
पिंपरी-चिंचवड जम्बो हाॅस्पिटल : २१ मे.टन
पुणे जम्बो कोविड हाॅस्पिटल : २२ मे.टन