Pune-Nashik Railway Route: पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात शंभर कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 05:31 PM2022-01-13T17:31:15+5:302022-01-13T17:31:24+5:30
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून शंभर कोटींचा पहिला टप्पा संबंधित जिल्हाधिका-यांकडे वर्ग केला आहे
पुणे : पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी आवश्यक असलेली जमीन मोजणी पूर्ण होत आली असून, जागेचा मोबदला निश्चित करून हवेली तालुक्यातून पैसे वाटप सुरू झाले आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून शंभर कोटींचा पहिला टप्पा संबंधित जिल्हाधिका-यांकडे वर्ग केला आहे. यामुळेच आता जमीन खरेदी प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे.
पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग हा अनेक वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय होता. परंतु गतवर्षी या रेल्वे मार्गाला परवानगी मिळून सध्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतेक सर्व गावांमधील जमिन मोजणी पूर्ण झाली आहे. आता जमिनीचे दर निश्चित करून जमिन खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठीचे पहिले खरेदी खत हवेली तालुक्यातील पेरणे गावापासून सुरू झाले आहे. आता शासनाने यासाठी शंभट कोटींचा पहिला टप्पा रिलीज केला आहे. यामुळेच जमिन खरेदी प्रक्रिया आता गतीने सुरू होण्यास मदत होणार आहे.
पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग २३५ किलोमीटरचा असून, या अंतर्गत दोन मार्ग बनविण्यात येणार आहेत. तर ही रेल्वे २०० किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी धावेल. पुण्यासह अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून ही रेल्वे जाईल. रेल्वेमार्गावर १८ बोगदे आणि ४१ उड्डाणपूल केले जाणार आहेत. या संपूर्ण कामासाठी तब्बल १५०० कोटीचा निधी लागणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुण्याचा खडतर आणि वेळखावू प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होणार आहे. आता शासनाने जलद गतीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
रेल्वेने त्वरीत अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा
''पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील 54 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. सर्व गावांमधील जमिन मोजणी पूर्ण होत आली असून, जमिनीचे दर निश्चित देखील अंतिम टप्प्यात आली आहे. हवेली तालुक्यात पैसे वाटप देखील सुरू झाले असून, रेल्वे विभागाने आता अधिकचा व आवश्यक सर्व निधी तातडीने उपलब्ध करून दिल्यास जमिन खरेदीची प्रक्रिया देखील विक्रमी वेळेत पूर्ण करणे शक्य होईल असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले.''
पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे
पुणे जिल्ह्यातील एकूण गावे : 54
- हवेली तालुक्यातील गावे : 12
- खेड तालुक्यातील गावे : 21
- आंबेगाव तालुक्यातील गावे : 10
- जुन्नर तालुक्यातील गावे : 08