पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघातात एक ठार
By Admin | Published: April 30, 2017 04:49 AM2017-04-30T04:49:10+5:302017-04-30T04:49:10+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण येथील मुख्य रस्त्यावरच अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने पाठीमागून ठोकर दिल्याने घडलेल्या अपघातात एक जण
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण येथील मुख्य रस्त्यावरच अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने पाठीमागून ठोकर दिल्याने घडलेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी सातच्या सुमारास घडली.
याच जागेवर अनेक अपघात घडून बऱ्याच जणांचे जीव जाऊनही हायवे प्रशासन आणि महामार्ग पोलीस कोणतीही दखल घेत नसल्याने या पुढील अपघातात त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करावी अशी मागणी पुढे येत आहे.
भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्गावर सौरभ रोडलाइन्सची मालवाहतूक करणारी ट्रक (एमएच १४,४५६२) मुख्य रस्त्याच्या कडेला पार्किंग करून ड्रायव्हर नाष्ट्यासाठी गेला असताना पाठीमागून पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच ०४ एच.डी. ५८९०) जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की यात बसलेले करीम फकरुद्दीन शेख (रा.सना हौसिंग सोसायटी सेक्टर नं.१ कळंबोली) यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो ड्रायव्हर शिवकुमार टेलरवाणी (रा.करारा बाजार) हे गंभीर जखमी झाले. दोन गाड्यांच्या धडकेच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात एवढा भीषण होता की यात मृत व्यक्तीच्या डोक्याची हाडे दूरपर्यंत फेकली गेली होती. तसेच घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
याठिकाणी अनेक अपघात होऊनही अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्यानेच अपघात घडला आहे. याप्रकरणी ट्रकड्रायव्हर मेहबूब हनीफ मुलाणी (रा. जयप्रकाशनगर पुणे) याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.