करडे येथील भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार , ७ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 07:41 PM2018-04-06T19:41:45+5:302018-04-06T19:41:45+5:30
कर्नाटक राज्यातील उदयगिरीनगर (ता. कोलार, जि. कोलार) येथील श्री. नरसिंह राजा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे आयोजन केले होते. युनिव्हा व इर्टिगा अशा दोन गाड्यांमध्ये १५ कर्मचारी प्रवास करत होते.
शिरूर : करडे गावाच्या हद्दीत बांदलमळानजीक भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर सात जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.६) दुपारी साडेबाराला घडला.
कर्नाटक राज्यातील उदयगिरीनगर (ता. कोलार, जि. कोलार) येथील श्री. नरसिंह राजा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे आयोजन केले होते. युनिव्हा व इर्टिगा अशा दोन गाड्यांमध्ये १५ कर्मचारी प्रवास करत होते. कोलार, चित्रदुर्ग, हुबळी, बेळगाव, कोल्हापूर, फलटण, चौफुला या मार्गाने प्रवास करत वाहने शिर्डीकडे चालली होती. दरम्यान चौफुल्याकडून शिरूरकडे जात असताना करडे गावाच्या हद्दीत बांदल मळ्यानजीक मोटारसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात युनिव्हाचा (केए एए/३४६७) चालक किरण प्रसाद (रा. कोलार, कर्नाटक) याचा गाडीवरील ताबा सुटून गाडी झाडावर आदळली. या अपघातात गाडीत बसलेले डॉ. शिवकुमार एच. आर. हे जिल्हा सर्जन अधिकारी डोक्यास व पायास गंभीर दुखापत होऊन ठार झाले. चालक किरण प्रसाद हा गंभीर जखमी असून अन्य सात जण जखमी आहेत. स्थानिकांनी जखमींना शिरूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात स्टाफ नर्स विजयकला बाळाजी (वय ३१, रा. उदयगिरी, ता. कोलार, जि. कोलार, कर्नाटक) यांनी चालक किरण प्रसादच्या विरोधात हलगर्जीपणे वाहन चालवून व अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त अधिकारी व कर्मचारी सर्व कर्नाटक येथील असल्याने त्यांना मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान नसल्याने संवाद साधण्यास फार अडचणी येत होत्या. स्थानिकांनी जखमींना त्वरित खासगी रुग्णालयामध्ये हलविले. त्याचवेळी शिर्डी येथील आरोग्य सेवेच्या खासगी क्षेत्रात काम करणारे धीरज सुभाष टाक यांना फोन आल्याने ते तातडीने शिरूर येथे आले. त्यांना कन्नड, मराठी, हिंदी भाषा ज्ञात असल्याने पुढील, पोलीस स्टेशन, हॉस्पिटलमधील सोपस्कर पार पाडणे सोईचे झाले.