पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू; घर्षणाने लक्झरी बस व दुचाकी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 01:13 PM2022-05-14T13:13:15+5:302022-05-14T13:24:51+5:30
सुदैवाने लक्झरी बसमधील जिवितहानी टळली
इंदापूर : लोणी देवकर (ता.इंदापूर) गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर हायवे रोडवरून (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५) यावली(ता.मोहळ) येथे जात असताना दुचाकीस्वाराला पाठीमागून येणार्या अशोक लेलंड दोस्त टेम्पोने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना १२ मे रोजी घडली आहे. याबाबत मयत इसमाचा भाऊ राहुल शंकर मेमाणे (वय ५२) रा.कोरेगाव मुळ, इनामदार वस्ती, ता. हवेली, जि. पुणे यांनी टोम्पो चालक याचे विरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदर अपघाताग्रस्त दुचाकी ही पाठीमागून येणार्या व सोलापूर दिशेने जाणारी लक्झरी बस (क्र. एम. एच. ११, सी.
एच. ६६७६) या बसखाली अडकून रस्त्याने फरफटत गेल्याने घर्षन होऊन दुचाकी व लक्झरी बसने पेट घेतला. लक्झरी बस व दुचाकी ही दोन्हीही वाहणे जागेवर जळून खाक झाली. सुदैवाने लक्झरीने पेट घेतल्यानंतर गाडी चालकाने प्रसंगवधान राखत लक्झरी बस रस्त्याच्या कडेला उभी केली व गाडीतील सर्व प्रवाशांना गाडीतून सुखरूप खाली उतरविले. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. परंतु प्रवाशांचे सामान, साहित्य सर्व जळून खाक झाले.
अनिल कविराज राऊत (रा.जळकोट, जि. लातुर) असे टेम्पो चालकाचे नाव असून त्याच्या ताब्यातील अशोक लेलंड दोस्त टेम्पो (क्र. एम. एच. १४, जीडी ८५१४) हा भरधाव वेगात, हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणाने व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून अपघातास व फिर्यादीचे मावस भावाच्या मृत्युस कारणीभूत व स्वत:चे टेम्पोचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.