हाणामारीत एकाचा मृत्यू ; आई, मुलास अटक
By admin | Published: May 7, 2017 02:25 AM2017-05-07T02:25:28+5:302017-05-07T02:25:28+5:30
किरकोळ कारणावरून जुन्नर येथील वरली आळी येथे शेजारी रहाणाऱ्या कुटुंबात झालेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : किरकोळ कारणावरून जुन्नर येथील वरली आळी येथे शेजारी रहाणाऱ्या कुटुंबात झालेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय सुरेश मुटके याचा पुणे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी आई व मुलगा अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. मयत दत्तात्रय यांची पत्नी अनिता यांनी जुन्नर पोलिसात फिर्याद दिली होती.
याबाबत घडलेली घटना अशी, जुन्नर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वरली आळी येथे शेजारी असणारे चिंचोले व मुटके कुटुंबातील मिना मुटके यांनी चिंचोले कुटुंबीयांचा मिक्सर सहा महिण्यापूर्वी वापरण्यास नेला होता. तो परत आणून न दिल्याने दत्तात्रय मुटके याने पत्नीला बडबड केली. यावरून दोन कुटुंबात किरकोळ भांडण झाले. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यात मार लागून जबर जखमी झालेले दतात्रेय मुटके यांना गंभीर दुखापत झाली. जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने पुण्यात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना गुरुवारी उशिरा रात्री मृत्यू झाला.
त्यावरून जुन्नर पोलिसांनी मिना रघुनाथ चिंचवले व मुलगा नितिन चिंचवले दोघे (रा.वरली आळी, ता. जुन्नर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन मिना चिंचवले व तिचा मुलगा नितिन चिंचवले या दोघा आरोपींना अटक केली. अधिक तपास जुन्नर पोलीस निरीक्षक कैलास घोडके करीत आहेत.