ट्रक अपघातात एक ठार
By admin | Published: July 2, 2017 02:09 AM2017-07-02T02:09:09+5:302017-07-02T02:09:09+5:30
येथे पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून मालवाहू दुसऱ्या ट्रकची धडक होऊन ट्रकच्या क्लीनरचा उपचारादरम्यान मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
यवत : येथे पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून मालवाहू दुसऱ्या ट्रकची धडक होऊन ट्रकच्या क्लीनरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ट्रकचालक जखमी झाला. अपघातात क्लीनर उमेश मोदाळे (वय २५, रा. लोहारा, जि. उस्मानाबाद) यांचा गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ट्रकचालक ज्ञानेश्वर बळी कांबळे
(वय २९, रा. हिप्परगा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) हे जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.२९) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. मालट्रक (एमएच४३ वाय २५५५) मुंबई येथून मशिनरी भरून चेन्नईकडे जात होता. या वेळी महामार्गावर दुसरा ट्रक (एमएच४२ बी ८०८९) उभा होता. या उभ्या ट्रकवर मशिनरी भरलेला ट्रक पाठीमागून धडकून अपघात झाला. या अपघातात क्लीनर उमेश मोदाळे गंभीर जखमी झाला. त्याला यवत येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान मोदाळे यांचा मृत्यू झाला.
बेशिस्त पार्किंग
यवत येथे महामार्गांच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक वाहने महामार्गावरच उभी करतात. उभ्या वाहनांचा अंदाज न आल्यामुळे असे अपघात सतत घडत असतात. यामुळे वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे. गावातील महामार्गाचा सेवारस्ता तर ट्रान्सपोर्टवाले त्यांच्या मालकीचा समजू लागले आहेत. अनेक ट्रक एका रांगेत सेवारस्त्यावर उभे केले जातात. यात पूर्ण सेवारस्ता अडवला जातो, मात्र यावर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करत आहे.