चाकणला चक्रेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त एक लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 05:14 PM2018-02-13T17:14:35+5:302018-02-13T17:15:19+5:30
महाशिवरात्री निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात व पंचक्रोशीतील महादेव मंदिरांमध्ये आज एक लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. दक्षता म्हणून मंदिर परिसरात चाकण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस पथक व साध्या वेशात दामिनी व निर्भया पथक तैनात करण्यात आले होते.
- हनुमंत देवकर
चाकण (पुणे) - महाशिवरात्री निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात व पंचक्रोशीतील महादेव मंदिरांमध्ये आज एक लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. दक्षता म्हणून मंदिर परिसरात चाकण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस पथक व साध्या वेशात दामिनी व निर्भया पथक तैनात करण्यात आले होते. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची आज पहाटे पासूनच अलोट गर्दी उसळली होती. चाकण येथील चक्रेश्वर मंदिर व परिसरातील खराबवाडीतील महादेव मंदिर, महादेव डोंगर येथे जावून लाखो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
चाकण येथे चक्रेश्वर मंदीर हे पुरातन व जागृत देवस्थान आहे. या मंदिरात शिवलिंग असून दर्शनासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी झाली होती. मंदिराच्या मंडपात अभिषेक करण्यात आले. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, चक्रेश्वर विकास समिती, चक्रेश्वर अंत्योदय सेवा समिती व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. महाशिवरात्री मुळे परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. अवघा चाकण परिसर शिवमय होऊन भक्तीरसात चिंब झाला होता. मंदिरापासून ३०० मीटर पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर आवारात भाविकांसाठी रांगेत दर्शन घेताना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप घालण्यात आला होता. दर्शनासाठी नवसह्याद्रीच्या कमानीपासून रांगा लागल्या होत्या. येथील मंदिर आवारात भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमासह अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. महाशिवरात्रीनिमित्त हभप अरविद महाराज शर्मा यांची कीर्तनसेवा झाली.
भाविकांना खिचडी, केळी, ताक व पाणी वाटप
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जय भोले अमरनाथ सेवा मंडळ, चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, नगरसेवक प्रकाश भुजबळ युवा मंच व बोल्हाईमाता मित्र मंडळ आदी सेवाभावी संघटनांच्या वतीने केळी व खिचडीचे वाटप करण्यात आले. येथील श्रीनाथ ज्वेलर्सच्या वतीने विवेक माळवे यांनी भाविकांना ताक वाटप केले. देवस्थान ट्रस्टने मंदिरात पुजेची चोख व्यवस्था केली होती. अमरनाथ सेवा मंडळाचे रामदास आबा धनवटे, गेसस्टॅम्पचे मनुष्यबळ सरव्यवस्थापक शिवाजी चौधरी, किरण गवारी, पांडुरंग गोरे, शांताराम जाधव, शेखर पिंगळे, जीवन जाधव, संजय मुंगसे यांनी फराळाचे वाटप केले.
खराबवाडीत पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह
खराबवाडी येथील महादेवाच्या डोंगरावर व पाण्याच्या टाकीजवळील महादेव मंदिरात भाविकांनी अभिषेक करून शिवलिंगाचे दर्शन घेतले. महादेवाच्या डोंगरावर माजी सरपंच हनुमंत कड यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. हभप डॉ. लक्ष्मण महाराज राऊत, तानाजी महाराज शिंदे यांची कीर्तनसेवा संपन्न झाली. हभप विशाल महाराज इंगळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. येथील हनुमान मंदिरात विजयकाका पुजारी व महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या रेवती कड, माधुरी खराबी, दीपाली खराबी, रंजना देवकर, मंगल देवकर, चारुशीला माने, नूतन कड, अनिता कड, पारुबाई कड, नंदा कड, कल्पना खराबी, शर्मिला खराबी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांनी सामूहिक रित्या ‘शिवलीला अमृत’ ग्रंथाचे पारायण केले.