पुण्यात एक लाख किंमतीचे बनावट सॅनिटायझर जप्त : पुणे पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 06:50 PM2020-03-14T18:50:46+5:302020-03-14T18:50:59+5:30
कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे सरकारने हॅन्ड सॅनिटायझरचा समावेश आवश्यक वस्तूंमध्ये केला आहे. मात्र, पुण्यात आरोपींनी घरातल्या घरात बनावट सॅनिटायझरचा निर्मितीचा कारखाना तयार केला. या माध्यमातून जास्तीचे पैसे कमावण्याच्या उद्देशाने बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या तीन व्यक्तींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजय शंकरलाल गांधी , मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांनी 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट सॅनिटायझरच्या विक्रीसाठी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. त्यासाठी त्यांनी मुंबईतील एका कंपनीतून पाच लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर पुण्यातल्या लोकल मार्केटमध्ये विकण्यात आले .
कोरोना विषाणू प्रादुदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .अशावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिक सॅनिटायझर आणि मास्क विकत घेत आहेत. याचाच फायदा घेत हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी परिसरामध्ये कारवाई केली.दरम्यान सॅनिटायझर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरीकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरीत पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर कळवावी किंवा 8975283100 व्हॉटस्?अप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.