Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: संमेलनाध्यक्षांना मिळणारा एक लाखांचा निधी, डॉ. जयंत नारळीकर स्वीकारणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:02 AM2022-04-18T11:02:51+5:302022-04-18T11:03:02+5:30
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना वाङ्मयीन कार्यासाठी एक लक्ष रुपयांचा निधी देण्यात ...
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना वाङ्मयीन कार्यासाठी एक लक्ष रुपयांचा निधी देण्यात येतो. पण, नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हा निधी स्वीकरणार नसून, महाराष्ट्र साहित्य परिषदेलाच हा निधी देणार आहेत.
"२०१० साली पुण्यात डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आयोजक संस्था असलेल्या पुण्यभूषण फाउंडेशनने ८२ लक्ष रुपयांची देणगी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिली. त्या देणगीच्या व्याजातून इतर साहित्यिक उपक्रमांबरोबर प्रतिवर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लक्ष रुपयांचा निधी दिला जातो. संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील अनेक साहित्य संस्था आणि ग्रंथालये कार्यक्रमासाठी निमंत्रित करीत असतात. अनेक साहित्य संस्था व ग्रंथालये यांना अध्यक्षांच्या प्रवास, निवासाची व्यवस्था करताना निधीअभावी अडचणी येत असतात. अशावेळी या निधीचा उपयोग संमेलनाध्यक्षांनी केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. तसेच संमेलनाध्यक्षांना काही वाङ्मयीन उपक्रम घ्यायचे असल्यासही या निधीचा उपयोग करता येतो. प्रतिवर्षी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा निधी साहित्य संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येतो.
नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मंगला नारळीकर यांच्याशी या निधी संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी हा निधी न स्वीकारता महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्याचा निर्णय घेतल्याचे जोशी यांनी सांगितले.