ज्येष्ठ दाम्पत्यांना पोलीस असल्याचे सांगून लंपास केले एक लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 03:49 PM2021-03-31T15:49:50+5:302021-03-31T15:50:27+5:30
भरदिवसा घडला हा फसवणुकीचा प्रकार
पिंपरी: पोलीस असल्याचे सांगून महिलेकडील एक लाख ८५ हजार रुपये किमतीचे ४६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. वाकड येथे छत्रपती चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास फसवणुकीचा हा प्रकार घडला.
रामचंद्र सदाशिवराव पंचगडे (वय ७७, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तीन अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचगडे व त्यांची पत्नी हे छत्रपती चौकाकडून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना तीन अनोळखी आरोपी तेथे आले. आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी त्यांनी केली. त्यानंतर पत्नीच्या हातातील व गळ्यातील एक लाख ८५ हजार रुपये किमतीचे ४६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने घेऊन गेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.