पुण्यात आज एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 08:34 AM2021-04-01T08:34:30+5:302021-04-01T08:36:05+5:30
अठरा वर्षा वरील लोकांचे सरसकट लसीकरण करण्यात यावे तसेच लसीचे जादा डोस मिळावे या मागणीसाठी प्रयत्न.
कोरोनाने ग्रासलेल्या पुण्यामध्ये आज एक अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. आज एका दिवसात तब्बल एक लाख लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज ४५ वर्षांच्या वरील सर्व लोकांचे लसीकरण सुरू केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज हा प्रयत्न केला जातो आहे.पुणे प्लॅटफॉर्म फोर कोव्हीड रिस्पॉन्स यांच्या वतीने हा प्रस्ताव देण्यात आला होता. शहर तसे जिल्हा प्रशासनाकडून आज याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पुणे शहरांमधील आणि जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. कालच पुणे शहरामध्ये जवळपास साडेचार हजार रुग्ण सापडले तर जिल्ह्याची संख्या साडेआठ हजारांवर गेली आहे. ही परिस्थिती आणखी बिघडू शकते अशी शक्यता तज्ञ वर्तवत आहेत. आणि त्यामुळेच शहरामध्ये लसीकरणा चा वेग वाढवला जावा अशी मागणी गेले काही दिवस सातत्याने पुढे येत आहे.
याचाच भाग म्हणून पुण्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे शक्य आहे हे दाखवण्यासाठी आज एक लाख लोकांचे लसीकरण एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जास्त लसीकरण करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे जास्त लसी पुरविल्या जाव्यात अशी मागणी या माध्यमातून केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लसीचा तुटवडा जाणवत होता. मात्र काल जवळपास तीन लाख डोस जिल्हा शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये वाटले गेले आहेत. लस उपलब्ध झाल्यामुळेच जास्तीत जास्त लसीकरणाचा हा प्रयोग राबवला जाणार आहे.
पुणे प्लॅटफॉर्मवर फोर कोव्हीड रिस्पॉन्स चे प्रमुख सुधीर मेहता यांच्या मते पुण्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन इथे सरसकट लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडे ही अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि जास्तीत जास्त लोकांच्या लसीकरण करणे शक्य आहे हे दाखवण्यासाठी एकाच दिवशी एवढी लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्षमता असल्याचे सिद्ध झाल्यास आणखी लसींची मागणी करणे शक्य होईल.