अकरावी प्रवेशासाठी एक लाखांच्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी; पसंतीक्रम भरण्याचा अंतिम दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 10:41 AM2020-09-07T10:41:13+5:302020-09-07T10:42:00+5:30
अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम ठरवण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
पुणे: पुणे व पिंपरी चिचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणा-या विद्यार्थ्यांच्या संखेने एक लाखाचा आकडा ओलांडला आहे.तसेच प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याचा सोमवारी (दि.७)शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पसंतीक्रम नोंदवावेत,असे आवाहन इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे करण्यात आले आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या १ लाख ६ हजार ७७५ जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत या जागांच्या प्रवेशासाठी १ लाख १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.त्यातील ८३ हजार २६७ विद्यार्थ्यांनी अर्जभरून लॉक केला असून ८२ हजार ६४८ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून झाले आहेत.तर एकूण ७४ हजार २१४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपैकी ३० हजार ६०२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून प्रवेशासाठी ७६ हजार १७३ जागा उपलब्ध आहेत.
----------------------
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्य फेरीसाठी आत्तापर्यंत ७७ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ७६ हजार १९७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरून पूर्ण केला आहे.तर ७४ हजार २१६ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केला आहे. मात्र,विद्यार्थ्यांना दुस-या फेरीतून प्रवेश मिळण्यासाठी सोमवारपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे.