गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल एक लाखांचा मुद्देमाल केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 05:10 PM2021-05-11T17:10:53+5:302021-05-11T17:11:00+5:30
पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई
राजगुरुनगर: खेडपोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख ८८ हजार रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व तंबाखू आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. अक्षय जयवंत शिंगोटे (वय २०), संतोष अंतुनाथ चव्हाण (वय ४०), अकलाब अब्दुलसत्तार आतार (वय ४५ ) हे दोन्ही रा.नारायणगाव अशी आरोपीची नावे असून खेडपोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
नारायणगाव येथून एक व्यक्ती राजगुरुनगर येथे गुटखा घेऊन विक्रीसाठी मोटारसायकलवर येणार आहे. अशी माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरिक्षक भारत भोसले आणि त्यांच्या पथकाने पानमळा येथे पुणे -नाशिक महामार्गावर सापळा रचला होता.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक जण मोटार सायकल वर एक पोते घेऊन येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याला ताब्यात घेतल्यावर जवळील पोत्यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांचा गुटखा मिळून आला. सखोल चौकशी केल्यावर त्याने अक्षय जयवंत शिंगोटे असे नाव सांगून गुटखा नारायणगाव येथून खरेदी करून विक्रीसाठी आणला असल्याची पोलिसांना कबुली दिली. खेड पोलिसांनी नारायणगाव येथे जाऊन पोलिसांच्या मदतीने संतोष अंतुनाथ चव्हाण, अकलाब आतार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला वेगवेगळया प्रकाराचा गुटखा, तंबाखु असा १ लाख ३७ हजार रुपयांचा अवैधरित्या बाळगलेला गुटखा जप्त केला. एक मोटारसायकल जप्त करुन आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलिस निरिक्षक सतीश गुरव करत आहे.