नदी सुधार योजनेच्या निविदेला एका महिन्याची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:56+5:302021-06-05T04:08:56+5:30
पुणे : मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या (जायका) निविदा प्रक्रियेला एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही ...
पुणे : मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या (जायका) निविदा प्रक्रियेला एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली असून आतापर्यंत जवळपास १७ कंपन्यांनी निविदा संच नेले आहेत. तब्बल १ हजार २३५ कोटींच्या या प्रकल्पाच्या निविदेला यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आलेली होती.
या योजनेसाठी १ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या निविदांसाठी ३० एप्रिलची मुदत देण्यात आली होती. कोरोनाच्या तडाख्यात शहर अडकल्याने तसेच लॉकडाऊनमुळे इच्छुक कंपन्यांनी निविदेची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने ३१ मे पर्यंत मुदत वाढविली होती. या कालावधीतही लॉकडाऊन असल्याने अनेक कंपन्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करता आली नाहीत. त्यामुळे पालिकेने पुन्हा ३० दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.
---------------
पालिकेच्या या योजनेला केंद्र शासनाने २०१६ साली मान्यता दिली. ही योजना पाच वर्षात अर्थात २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, सल्लागार नेमण्यास दोन वर्षे लागली. चढ्या भावाने आलेल्या निविदा आणि या निविदांवरून उभा राहिलेला गोंधळ निस्तारण्यात आणखी दोन वर्षे गेली. यामुळे योजनेचा खर्च ९९१ कोटी रुपयांवरून वाढून १२३५ कोटींवर गेला. तर, १५ वर्षांच्या देखभालीसाठी आणखी ३०० कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे.